Talathi has been in charge of the charge for two years | तलाठी पदाचा कारभार दोन वर्षांपासून प्रभारीच्या खांद्यावर
तलाठी पदाचा कारभार दोन वर्षांपासून प्रभारीच्या खांद्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क 
बांबर्डा कानकिरड (वाशिम):  कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे महसूल मंडळांतर्गत येत असलेल्या बांबर्डा कानकिरड येथे तलाठी पदाचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून प्रभारीच्या खांद्यावर आहे. त्यामुळे बांबर्डासह अन्य पाच गावात शासकीय योजनांच्या अमलबजावणीवर परिणाम होत असून, शेतकरी, शेतमजुर शासकीय योजनांपासून वंचित राहत आहेत. मागील काही दिवसांपासून स्थानिक ग्रामपंचायत व गावकºयांकडून येथे स्वतंत्र तलाठी देण्याची मागणी कारंजाच्या तहसीलदारांकडे करण्यात येत आहे. 
बांबर्डा कानकिरड हे गाव हिवरा लाहे महसुल मंडळात येत असून साझा क्रमांक ६२ चे मुख्यालय आहे. या साज्यात बांबर्डासह जयपूर, अजनपुर, शिंगणापूर, अंतरखेड व जामठी अशा सहा गावांचा समावेश आहे. सद्यपरिस्थितीत उपरोक्त सहाही गावांचा पदभार हा हिवरा लाहे येथे कार्यरत असलेल्या तलाठ्यांकडे देण्यात आला आहे. हिवरा लाहे ते बांबर्डा हे अंतर जवळपास ३० किलोमीटर असल्याने प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी व शेतमजुरांना शासकीय योजनांविषयी माहिती देणे शक्य होत नाही. शिवाय शेतकरी व शेतमजूर यांना विविध योंजनांची माहिती, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले योग्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधितांवर अनेक योजनांपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. सद्यस्थितीत अतिरिक्त प्रभार असलेल्या तलाठ्यांकडे उपरोक्त सहा गावांसहीत हिवरा लाहे व पिंप्री मोडक या दोन मोठ्या गावांचा देखील पदभार देण्यात आल्याने सदर तलाठ्यास ८ गावे सांभाळणे कठीण झाले आहे. बांबर्डा मुख्यालय असलेल्या उपरोक्त सहा गावांसाठी स्वतंत्र तलाठी देण्यात यावा अशी मागणी बांबर्डा परिसरातील ग्रामस्थांकडून केल्या जात आहे.


Web Title: Talathi has been in charge of the charge for two years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.