समाजकल्याणचा लाचखोर लिपीक ‘एसीबी’च्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:42 IST2018-12-01T14:42:02+5:302018-12-01T14:42:11+5:30
येथील समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ डिसेंबर रोजी रंगेहात जेरबंद केले.

समाजकल्याणचा लाचखोर लिपीक ‘एसीबी’च्या जाळ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : इयत्ता बारावीत शिकणाºया एका विद्यार्थ्याकडून ‘स्वाधार’ योजनेच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ३ हजारांची लाच मागणारा व त्यापोटी १५०० रुपये लाच स्विकारणाºया येथील समाजकल्याण विभागाच्या कनिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ डिसेंबर रोजी रंगेहात जेरबंद केले.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार विद्यार्थ्याने ३० नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले, की शासनामार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ पाहिजेत असल्यास तसेच यादीत नाव समाविष्ट करायचे असल्यास वाशिम येथील समाजकल्याण विभागाचा कनिष्ठ लिपीक पवन बाबाराव म्हस्के (वय २७ वर्षे) याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५०० रुपये देण्याचे ठरले.
अशा आशयाच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १ डिसेंबर रोजी सापळा रचून कनिष्ठ लिपीक म्हस्के यास तक्रारदाराकडून १५०० रुपये स्विकारताना रंगेहात जेरबंद केले. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक धिवरे अतिरिक्त अधिक्षक डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक राहुल गांगुर्डे ,सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, नंदकिशोर परळकर, पोलिस हवालदार बेलोकर, पोलिस नायक विनोद अवगळे यांनी केली.