महिला चालकांची पद भरती; मात्र चालक परवानेच नाहीत
By Admin | Updated: February 27, 2015 00:56 IST2015-02-27T00:56:46+5:302015-02-27T00:56:46+5:30
राज्य परिवहन महामंडळाची भरती; महिलांच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता.

महिला चालकांची पद भरती; मात्र चालक परवानेच नाहीत
वाशिम : राज्य परिवहन महामंडळाने चालक पदासाठी सुरू केलेल्या भरती प्रक्रियेमध्ये प्रथमच महिला चालकांसाठी पद भरतीची जाहिरात काढली आहे. महिलांच्या ३0 टक्के आरक्षणानुसार या भरतीमध्ये राज्यात २ हजार महिलांना चालक होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे; मात्र जड वाहन चालविण्याचा परवाना असलेल्या महिलांची संख्या नगण्यच आहे, त्यामुळे या भरती प्रक्रियेतील अनेक पदे रिक्तच राहण्याची शक्यता बळवली आहे.वाशिमचा विचार केला तर एकाही महिलेजवळ जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची माहिती सूत्रांनी २५ फेब्रुवारी रोजी ह्यलोकमतह्ण ला दिली. चालक पदासाठी जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच तीन वर्ष जड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे. या संदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) संपर्क केला असता एकाही महिलेकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याची बाब समोर आली आहे. महिलांकडे दुचाकी व हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असतो; मात्र जड वाहन चालविण्याचा परवाना बहुतेक महिलांकडे नसतो. वाशिम जिल्ह्यात तर अशा प्रकारचा परवाना एकाही महिलेकडे नाही. राज्यात ३0 टक्के आरक्षणानुसार २२९४ महिला चालकांची पदे निघाली आहेत. ही पदे भरताना पुरुष चालकाप्रमाणेच महिला चालकाला अटी लावण्यात आल्या आहेत. या नियम व अटीमध्ये राज्यातील किती महिलांना या नोकरीची संधी मिळते. याबाबत साशंकताच आहे. वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सहसा महिला घेत नाही. परिवहन महामंडळाची बस चालवायची असल्यास अवजड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक आहे. त्यासोबत प्रवाशी वाहन चालविण्याचा बिल्ला आवश्यक ठरत असल्याचे नमूद केले.
*महिला व पुरुष चालकांना एकच नियम
राज्य परिवहन महामंडळामध्ये चालक पदासाठी मेगा भरती होत आहे. यावेळी प्रथमच एसटीमध्ये महिला चालकांची भरती घेणार असून, राज्यातील ३१ विभागात जवळपास ५ हजार महिलांना चालक होण्याची संधी आहे. विशेष म्हणजे महिला व पुरुष यांच्यासाठी समान अटी ठेवण्यात आल्या आहेत.