वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी वनपरिसरात सौर कुंपणाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 17:18 IST2020-11-04T17:18:21+5:302020-11-04T17:18:41+5:30
Washim Forest News वाशिम जिल्ह्यात वनविभागाने शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव तयार केला आहे.

वन्यप्राण्यांपासून सुरक्षेसाठी वनपरिसरात सौर कुंपणाची तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासनाने वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान आणि यातून घडत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जंगली भागातील शेती सौर कुंपनाने संरक्षीत करण्याची योजना आखली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेंतर्गत शिव पिक संरक्षण योजना म्हणून ती राबविण्याबाबत वाशिम जिल्ह्यात वनविभागाने शेतकऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव तयार केला आहे.
शिव पिक रक्षक योजनेंतर्गत वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे होणारे नुकसान आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सौर कुंपण योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी शासनाने वनालगत शेती असणाºयां शेतकºयांकडून अभिप्राय मागविण्यासह वन्यप्राण्यांमुळे सर्वाधिक पीक नुकसान होणाºया गावांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार वाशिमचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी शेतकºयांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधत ही योजना त्यांना पटवून दिली. संवेदनशील असलेल्या वनपरिक्षेत्राच्या सीमेपासून ५ किलोमीटर अंतरात असलेल्या गावांत सामूहिक जाळीचे कुंपण या योजनेंतर्गत तयार करण्यात येणार आहे.
या संदर्भातील आराखडा तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला.
शासनाच्या निर्देशानुसार शिव पिक संरक्षण योजनेतंर्गत सौर कुंपणासाठी शेतकऱ्यांचे अभिप्राय नोंदविण्यात आले. त्यात ३० गावांत बैठकी घेण्यात आल्या. ही योजना सामूहिक स्वरूपाची असल्याने सलग शेती असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे.
-सुमंत सोळंके,
उपवनसंरक्षक, वाशिम