Nashik Bus Fire: नाशिकमधील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरोडीच्या पंढरी भिलंद यांचा समावेश
By सुनील काकडे | Updated: October 8, 2022 15:53 IST2022-10-08T15:40:38+5:302022-10-08T15:53:02+5:30
Nashik Bus Fire: बोलेरो गाडी आणायला नाशिक येथे जाण्याचा बेत ठरला. त्यानुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले आणि चुलत भावाला सोबत घेऊन त्यांनी प्रवासाला सुरूवात केली; मात्र नाशिकला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली.

Nashik Bus Fire: नाशिकमधील बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरोडीच्या पंढरी भिलंद यांचा समावेश
- सुनील काकडे
वाशिम - बोलेरो गाडी आणायला नाशिक येथे जाण्याचा बेत ठरला. त्यानुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले आणि चुलत भावाला सोबत घेऊन त्यांनी प्रवासाला सुरूवात केली; मात्र नाशिकला पोहचण्यापूर्वीच काळाने झडप घातली. काही कळण्याच्या आत पेटलेल्या ट्रॅव्हल्समध्ये जिल्ह्यातील तरोडी (ता.मालेगाव) येथील उद्धव पंढरी भिलंद यांचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली.
नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतली. त्यामुळे आतमध्ये साखरझोपेत असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ माजली. ट्रॅव्हल्समध्ये वाशिम जिल्ह्यातील १० प्रवाशी प्रवास करत होते, अशी माहिती हाती आली आहे. त्यात ५५ वर्षीय उद्धव पंढरी भिलंद (तरोडी) यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला; मात्र त्यांच्यासोबत गेलेला त्यांचा चुलतभाऊ वैभव वामन भिलंद (२५) याची ओळख पटलेली नाही. त्यामुळे तो जखमी आहे किंवा त्याचाही अपघातात मृत्यू झाला, हे निश्चितपणे कळू शकले नाही.