Nashik Bus fire: नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख? ‘ट्रॅव्हल्स’वाल्यांचा गोरखधंदा उघड
By सुनील काकडे | Updated: October 8, 2022 15:59 IST2022-10-08T15:58:26+5:302022-10-08T15:59:18+5:30
Nashik Bus fire: नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला; तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

Nashik Bus fire: नाशिकमधील अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही, कशी पटणार ओळख? ‘ट्रॅव्हल्स’वाल्यांचा गोरखधंदा उघड
- सुनील काकडे
वाशिम : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील तपोवननजिक आज, ८ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातात निष्पाप प्रवाशांना जीव गमवावा लागला; तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील काही प्रवाशांचा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे तिकीट बुकींगच नाही. ट्रॅव्हल्स बुकींग ऑफीस चालविणाऱ्यांच्या नावे तिकीट बुक आहेत. यामुळे अपघातग्रस्तांची ओळख नेमकी कशी पटणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
चिंतामणी ट्रॅव्हल्स आणि टॅंकरमध्ये घडलेल्या अपघातानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतला. यामुळे आतमध्ये असलेल्या अनेक प्रवाशांचा जागीच जळून कोळसा झाला; तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर प्रवाशी नेमके कुठले, याची चाचपणी केली जात आहे; मात्र अपघातग्रस्तांपैकी अनेकांच्या नावे अधिकृतरित्या प्रवासाचे तिकीट बुकींग नाही; तर नेहमीप्रमाणे तिकीट बुकींग करणाऱ्यांनी स्वत:च्या नावे तिकीट बुक केलेले आहे. त्यांचीच नावे यादीमध्ये दिसून येत आहेत. संबंधितांच्या नावासमोर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही बाब उघड झाली. यामुळे अपघातग्रस्तांची ओळख नेमकी कशी पटणार आणि जखमींपैकी कुणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरकारकडून मदत नेमकी कशी मिळणार, असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
केनवडवरून बसलेल्या प्रवाशांचा यादीत नामोल्लेख नाही
वाशिम जिल्ह्यातील केनवड (ता.रिसोड) येथून शेख इस्माईल आणि जैतून लतीफखाॅं पठाण हे दोन प्रवाशी चिंतामणी ट्रॅव्हल्सने नाशिककडे रवाना झाले होते. ते अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तिथेच उपचार सुरू आहेत. मात्र, या दोन्ही प्रवाशांचा जखमींच्या यादीत कुठेच नामोल्लेख नाही. कारण जाणून घेतले असता, केनवड येथील ट्रॅव्हल्स तिकीट ऑनलाईन बुक करणाऱ्या इसमाने मालेगावातून दोघांची तिकीटे काढून दिली. तिकीट त्याने स्वत:च्या नावाने बुक केले. त्यामुळेच मोठा घोळ निर्माण झाल्याची बाब उघड झाली.