धोडप येथील हत्या प्रकरण: सख्खा भाऊच निघाला संदीपचा मारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 13:53 IST2019-12-24T13:53:20+5:302019-12-24T13:53:27+5:30
संदीप याची हत्या सख्खा भाऊ प्रदीप याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचेही स्पष्ट झाले.

धोडप येथील हत्या प्रकरण: सख्खा भाऊच निघाला संदीपचा मारेकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : धोडप उगले ता. रिसोड येथील संदीप शेषराव बकाल याचा मृत्यू नसून, हत्या केल्याची बाब पोलीस तपासातून सोमवारी समोर आली. या प्रकरणात संदीप याची हत्या सख्खा भाऊ प्रदीप याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचेही स्पष्ट झाले.
२६ नोव्हेंबर रोजी हरविलेल्या संदीप बकाल याचा मृतदेह ६ डिसेंबर रोजी रिसोड ते वाशिम मार्गावरील आसेगावजवळील पैनगंगा नदी पात्रात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. संदीप शेषराव बकाल (२८) हा आपल्या गावावरून २६ नोव्हेंबर २०१९ रोजी वाशिमला निघाला होता. त्यादिवशी वाशिमहून संदीप हा आपल्या मामाच्या गावी रिठद येथे पोहोचला. तिथे आपल्या मामाला भेटल्यानंतर पेट्रोल भरून येतो असे सांगून तिथून गावाकडे निघाला. मात्र तो आपल्या मूळ गावी धोडप किंवा आपल्या मामाच्या गावी रिठद येथे पोहोचला नसल्याने मृतक संदीपच्या नातेवाईकांनी रिसोड येथील पोलीस स्टेशनला ३० नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली. त्यानंतर नातेवाईकांसह पोलीस त्याचा शोध घेत होते. ६ डिसेंबर रोजी सकाळी पैनगंगा नदीतील जुन्या पुलाजवळ गावकऱ्यांना पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.
संदीप बकाल याची हत्या ही सख्खा भाऊ प्रदीप शेषराव बकाल याने अन्य तीन जणांच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. पोलीस तपासातून संदीपचे एका मुलीसोबत एकतर्फी प्रेम होते तसेच संदीपला अन्य छंद असल्याने या घटनेचा तपास नेमका कसा करावा, याचा पेच पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांनी मृतकाचा सख्खा भाऊ प्रदीप बकाल, राहुल गजानन इंगोले, संतोष ऊर्फ गोलू रतन इंगोले, रामप्रसाद सुभाष इंगोले आदींची कसून चौकशी केली असता, प्रदीप याने उपरोक्त तिघांच्या मदतीने संदीपची हत्या करून प्रेत आसेगाव पेन येथील नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे पोलीस तपासातून समोर आले. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे व त्यांच्या चमूने केला.