नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 13:40 IST2021-03-02T13:37:47+5:302021-03-02T13:40:45+5:30
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते सोमवार 1 मार्चपासून कर्तव्यावर रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे.

नगराध्यक्ष अन् मुख्याधिकारी रस्त्यावरच भिडले, व्हिडिओ व्हायरल
वाशीम - वाशिमच्या कारंजा नगरपालिकेतील मुख्याधिकारी, नगराध्यक्षांमध्ये भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. कारंजा नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर आणि नगराध्यक्ष शेषराव ढोके यांच्यात शाब्दिक वादानंतर फ्री स्टाईल हाणामारी झाली. सोमवार 1 मार्च रोजी कारंजा शहरातील मंगरूळपीर रोडनजीकच्या एका पेट्रोलपंपासमोर सायंकाळी ही घटना घडली. त्यावेळी, उपस्थितांनी मध्यस्थी करुन हा वाद सोडवला.
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते सोमवार 1 मार्चपासून कर्तव्यावर रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. संध्याकाळी पाच ते सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी आहे. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर 1 मार्च रोजी सायंकाळी आपले कर्तव्य बजावत असताना एका पेट्रोल पंपाजवळ रसवंती व एक हॉटेल व्यवसायिक हे दुकाने बंद करण्याची वेळ सायंकाळी 5 असतानासुद्धा सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवलेली त्यांना दिसली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रकिया मुख्याधिकारी दादाराव दोल्हारकर व कोरोना पथक प्रमुख राहुल सावंत व कर्मचारी करत होते. त्यावेळी, नगराध्यक्ष शेषराव ढोके त्याठिकाणी आले. ते म्हणाले की, श्रीमंतावर कारवाई न करता गरिबांवर कार्यवाही करू नका. मात्र, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरुन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर आणि ढोके यांच्यात बाचाबाची झाली, तसेच ते एकमेकांच्या अंगावर देखील धावून गेले. यासंदर्भात एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, तालुक्यात सगळीकडे याचीच चर्चा रंगली होती.