Lockdown in Washim : सात दिवसांचे कडक निर्बंध; प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 11:28 AM2021-05-09T11:28:54+5:302021-05-09T11:29:02+5:30

Lockdown in Washim: विविध वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शनिवारी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

Lockdown in Washim: Strict restrictions for seven days; Administration ready | Lockdown in Washim : सात दिवसांचे कडक निर्बंध; प्रशासन सज्ज

Lockdown in Washim : सात दिवसांचे कडक निर्बंध; प्रशासन सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात रविवार, ९ मेपासून पुढील सात दिवस कडक निर्बंध असून, अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान, सात दिवस कडक निर्बंध असल्याने विविध वस्तू, साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी शनिवारी बाजारपेठेत एकच गर्दी केल्याचे दिसून आले. यादरम्यान जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत वृत्तपत्रे घरपोच पोहचविण्याची मुभा राहणार आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी लागू आहे. तथापि, कोरोनाचा कहर सुरूच असल्याने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात ९ मे ते १५ मे या दरम्यान कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी राहणर आहे. तसेच दवाखाने, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना पूर्णत: बंद राहणार आहेत. दरम्यान, रविवारपासून लॉकडाऊन असल्याने शनिवारी वाशिमसह कारंजा, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, मानोरा यासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत सकाळी ९ ते ११ या वेळेत विविध वस्तू, साहित्य, भाजीपाला खरेदीसाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. वाशिम येथील पाटणी चौकस्थित बाजारपेठेत गर्दीने उच्चांक गाठला. पेट्रोलपंपावरही वाहनचालकांच्या रांगा दिसून आल्या. बाजारपेठेतील गर्दी पाहून सात दिवसाच्या कडक निर्बंधासाठी नागरिकांनी जणू महिनाभरासाठी पुरेल एवढे साहित्य, वस्तू खरेदी केल्याचे दिसून आले. कडक निर्बंधाची अंमलबजावणी म्हणून रविवारपासून प्रमुख चौकांत तसेच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून, अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी फिरत असल्याचे दिसून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.


वृत्तपत्र वितरणाला मुभा
सध्याच्या कोरोनाच्या काळात वृत्तपत्र हेच माहिती मिळण्याचे अधिकृत, खात्रीलायक व विश्वासार्ह माध्यम आहे, त्यामुळे वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी ८ मे रोजी आदेश जारी केला. जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत वृत्तपत्रे घरपोच पोहचविण्याची मुभा राहणार असून, या दरम्यान वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्तपत्राचे वितरण करण्याकामी कुणीही अडवू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत. वृत्तपत्र वितरणला मुभा असून, या दरम्यान कुणीही अडवू नये, अशा सूचना पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.

अत्यावश्यक सेवेची ही दुकानेही राहणार बंद
किराणा माल,  भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी, खाद्यपदार्थांची सर्व दुकाने
सर्व प्रकारची मद्यागृहे, मद्य दुकाने व बार, (या सर्व दुकानांना सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत घरपोच सेवा चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात स्वत: जाऊन खरेदी करता येणार नाही.)

Web Title: Lockdown in Washim: Strict restrictions for seven days; Administration ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.