काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनचे काम अंतिम टप्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 16:13 IST2018-04-02T16:13:04+5:302018-04-02T16:13:04+5:30
मालेगाव - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा या दरम्यान पाईपलाईन टाकली जात असून, सद्यस्थितीत सदर काम अंतिम टप्प्यात आहे. २ एप्रिल रोजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्यासह चमूने या कामाची पाहणी केली.

काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनचे काम अंतिम टप्यात !
मालेगाव - मालेगाव शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा या दरम्यान पाईपलाईन टाकली जात असून, सद्यस्थितीत सदर काम अंतिम टप्प्यात आहे. २ एप्रिल रोजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत यांच्यासह चमूने या कामाची पाहणी केली.
मालेगाव शहरात पाणीटंचाई ही जणू पाचवीलाच पुजलेली आहे. पाणीटंचाईवर मात म्हणून मालेगाव शहराच्या आजुबाजुला कोल्ही, केळी, कुरळा आणि काटेपूर्णा हे प्रकल्प आहेत. त्यात गरजेपुरते पाणी शिल्लक असते. यंदा मात्र उन्हाळ्यात केवळ काटेपुर्णा प्रकल्पात पाणी असून ते मालेगावला मिळावे, यासाठी मालेगाव नगर पंचायतीने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता. प्रकल्पापासून कुरळा धरणापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपयांचा निधी आवश्यक असून कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना त्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. या प्रस्तावाला फेब्रुवारी महिन्यात मान्यता मिळून १.३४ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यानुसार पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले. २ एप्रिल रोजी नगराध्यक्ष मीनाक्षी सावंत, नगरसेवक संतोष जोशी, अरुण बळी, रामदास बळी यांनी पाहणी करीत कामाचा आढावा घेतला. ही पाईप लाइन काही दिवसात पूर्ण होणार असून लवकरच पाणीपुरवठा होईल, असा विश्वास व्यक्त केला. काटेपुर्णा ते कुरळा या दरम्यान आठ किमी अंतराची पाईपलाईन आहे. मागील काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तिने तेथील पाइप जाळले होते. म्हणून पाईपलाईनचे काम थांबते की काय? अशी भीती वर्तविली जात होती. आता पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काटेपूर्णा ते कुरळा तातडीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम सुरु आहे. ७ ते ८ दिवसामध्ये हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.
- मीनाक्षी सावंत, नगराध्यक्ष, मालेगाव नगर पंचायत