जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून खदान, क्रेशरची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 19:14 IST2021-07-29T19:14:01+5:302021-07-29T19:14:14+5:30
Washiim News : यावेळी अवैध वाहतूक करताना आढळून आलेल्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली.

जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून खदान, क्रेशरची तपासणी
वाशिम : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून २८ जुलै रोजी तोंडगाव, तामसाळा व हिस्से बोराळा येथील ११ खदान, क्रेशरची अचानक तपासणी केली. यावेळी अवैध वाहतूक करताना आढळून आलेल्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूमी अभिलेख विभाग यांच्या संयुक्त पथकाने २८ जुलै रोजी तोंडगाव येथील ४, तामसाळा येथील १ व हिस्से बोराळा येथील ६ खदान, क्रेशरची अचानकपणे भेट देवून तपासणी केली. या सर्व खदानधारक व क्रेशरधारकांनी परवाना दिनांकापासून आतापर्यंत किती प्रमाणात उत्खनन केले आहे, उत्खननाच्या अनुषंगाने स्वामित्वधनाचा किती भरणा केला आहे. तसेच ईटीएस मशीनद्वारे खदानीची मोजणी झाली असल्यास त्याची प्रत व ब्लास्टिंग ज्या व्यक्ती मार्फत करण्यात येते, त्या व्यक्तीच्या परवान्याची प्रत तत्काळ तहसीलदार कार्यालयात सदर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.