Helping flood victims by avoiding the cost Rituals of Mother | आईच्या तेरवीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत
आईच्या तेरवीचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत

ठळक मुद्दे३० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री निधीत म्हैसणे परिवाराकडून पाठविण्यात येणार आहे.तेरवीसह इतर खर्चाला फाटा देऊन ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले.म्हैसणे परिवाराचा हा निर्णय समाजासाठी आदर्श ठरावा, असाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलुबाजार (वाशिम): पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराने हजारो लोक बेघर झाले आहेत. या पुरग्रस्तांना आर्थिक मदत व्हावी म्हणून दिवंगत आईच्या तेरवीसह इतर खर्च टाळून तो निधी पूरग्रस्तांना पाठविण्याचा आदर्श निर्णय मंंगरुळपीर तालुक्यातील सागर म्हैसणे व त्यांच्या परिवाराने घेतला आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील सागर म्हैसने यांच्या मातोश्री उषाबाई शेषराव म्हैसणे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी सोमवार १९ आॅगस्ट रोजी निधन झाले. त्यामुळे म्हैसणेपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला. तथापि, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे तेथील बांधवांवर मोठे संकट आले. हजारो परिवारांचे एका दिवसात होत्याचे नव्हते झाले. पुराने अनेकांचा बळीही घेतला. या पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. त्यामुळे म्हैसणे परिवारानेही उषाबाई म्हैसणे यांचे अंतिम संस्कार पार पाडत आपले दु:ख विसरून निधनानंतरच्या तेरवीसह इतर खर्चाला फाटा देऊन ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले. यासाठी गावातील सोसायट्याही त्यांना मदत करणार असून, जवळपास ३० हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री निधीत जमा करण्यासाठी म्हैसणे परिवाराकडून पाठविण्यात येणार आहे. म्हैसणे परिवाराचा हा निर्णय समाजासाठी आदर्श ठरावा, असाच आहे.


Web Title: Helping flood victims by avoiding the cost Rituals of Mother
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.