जि.प. शाळा वाचविण्यासाठी संघटना सरसावल्या
By संतोष वानखडे | Updated: September 29, 2022 16:47 IST2022-09-29T16:46:06+5:302022-09-29T16:47:09+5:30
Vashim News: २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा बचाव समितीने याविरोधात आवाज उठविला आहे.

जि.प. शाळा वाचविण्यासाठी संघटना सरसावल्या
- संतोष वानखडे
वाशिम -२० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली शासन स्तरावरून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शाळा बचाव समितीने याविरोधात आवाज उठविला आहे. पश्चिम वऱ्हाडात याची सुरूवात वाशिम येथून गुरुवारी ( दि.२९ ) झाली असून समिती सदस्यांसह शेकडो पालक जिल्हाधिकारी कार्यालय धडकले.
विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांसमोर आव्हानात्मक परिस्थिती उभी ठाकली आहे. या सरकारी शाळा वाचविण्यासाठी शाळा बचाव समिती, शिक्षणप्रेमी, सामाजिक संघटनांनी कृती आराखडा आखला असून, गावोगावी जनजागृती केली जाणार आहे. जिल्हा परिषद, नगर परिषद व इतर काही मराठी शाळांची सद्यस्थितीत दैनावस्था झाली आहे. काही शाळांचा अपवाद वगळता बहुतांश शाळांमध्ये पुरेशा भौतिक सुविधा नसणे, पुरेसे शैक्षणिक वातावरण नसल्याने तसेच पालकांमध्ये या शाळांबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाल्याने शाळांची पटसंख्या कमी होत आहे. परिणामी वाशिम जिल्ह्यातील १३३ शाळांवर गंडांतर आहे. विद्यार्थी संख्येअभावी सरकारी शाळा बंद होऊ नये म्हणून शाळा बचाव समितीने पुढाकार घेत गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नये, शिक्षकांची भरती करावी, जि.प. शाळेत पुरेशा सुविधा पुरवाव्या आदी मागण्या करण्यात आल्या.