अमानी-मालेगाव मार्गावर चार वाहने धडकली एकमेकांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 17:24 IST2018-04-30T17:24:52+5:302018-04-30T17:24:52+5:30
मालेगाव (वाशिम) : भरधाव वेगात धावणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागे धावत असलेली बस, इनोव्हा कार आणि क्रुझर ही वाहने एकामागोमाग धडकली.

अमानी-मालेगाव मार्गावर चार वाहने धडकली एकमेकांवर!
मालेगाव (वाशिम) : भरधाव वेगात धावणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागे धावत असलेली बस, इनोव्हा कार आणि क्रुझर ही वाहने एकामागोमाग धडकली. या विचित्र अपघातात सुदैवाने जिवीतहानी झालेली नसली तरी वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना अमानी-मालेगाव मार्गावर सोमवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, रस्त्यावरून वेगात धावत असलेल्या एम.एच.२०/सी.६६९७ या क्रमांकाच्या कंटेनरने अमानी-मालेगाव मार्गावर अचानक ब्रेक मारला. यावेळी या वाहनाच्या मागे एम.एच.०७/सी.९३८९ या क्रमांकाची बस, एम.एच.२६/बी.सी. ३३६६ या क्रमांकाची इनोव्हा आणि एम.एच.३०/पी.१३५१ या क्रमांकाचे क्रुझर वाहन धावत होते. या सर्व वाहनचालकांचे अचानक उडालेल्या गोंधळामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही वाहने एकामागोमाग धडकली. त्यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कार्यवाही सुरू होती.