रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:32 IST2019-04-23T16:15:28+5:302019-04-23T16:32:36+5:30
लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली आहेत.

रिसोडच्या वन उद्यानात पाण्याअभावी झाडे सुकली
शीतल धांडे
रिसोड - लाखो रुपये खर्च करून रिसोड शहराजवळ वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. सद्यस्थितीत वन उद्यान भकास दिसत असून, पाण्याअभावी झाडे सुकून गेली तर सौर ऊर्जेवर चालणारे जवळपास २०० लाईट बंदस्थितीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रिसोड शहरात एकही उद्यान नसल्याने साधारणत: तीन वर्षांपूर्वी वनविभागातर्फे वन उद्यान साकारण्यात आले. यासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला. येथे बच्चे कंपनीसाठी खेळण्याचे विविध साहित्य आहे. सोमवारी (२२ एप्रिल) येथील वन उद्यानाची पाहणी केली असता, वन उद्यानाच्या मूळ उद्देशाला तडा जात असल्याचे चित्र समोर आले. योग्य देखभाल नसल्याने वन उद्यान भकास झाले आहे. पाणी नसल्याने उद्यानातील झाडे सुकून गेल्याचे दिसून येते. सकाळ व सायंकाळच्या सुमारास या उद्यानात फिरण्यासाठी काही नागरिक, महिला येतात. उद्यान भकास दिसत असल्याने उद्यानात येणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते.
वन उद्यानात सुविधांचा अभाव असल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. उद्यानात पिण्यासाठी पाणीसुद्धा उपलब्ध नाही. उद्यानात सौर उर्जेवर चालणारे २१० लाईट बसविण्यात आले आहे. यातील सर्वच लाईट बंद आहेत. बहुतांश लाईटची बॅटरी सुध्दा चोरीला गेल्याचे दिसून आले. मुख्य प्रवेशद्वारासमोरील लाईट कधी बंद तर कधी कधी सुरु असतो. सौर ऊर्जेवर चालणारा पाण्याचा पंप सुद्धा बंद अवस्थेत आहे. महाशिवरात्रीपासुन येथील वन परीक्षेत्र अधिकारी वानखेडे हे रजेवर असल्याची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. उद्यानातील मुलांचे खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. यामध्ये चार पाळणे व छत्र्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. घसरगुंडी सुद्धा तुटली आहे. तीन बोअर असुन सुद्धा उद्यानातील बरीच झाडे पाण्याअभावी सुकली आहेत.
वन उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याकरीता मोठया प्रमाणात नविन साहित्य आलेले आहे. परंतु देखभालअभावी ते सुध्दा कित्येक दिवसांपासबन धुळ खात पडले आहे. उद्यानात रोपवाटिका असुन खैरी, साग, सिताफळ, चिंच, गुलमोहर, कविट, चिल्लारी रोप, लिंब, कांचन, बांबु आदी रोपे आहेत. पाणीटंचाईमुळे रोपवाटिका जगविण्याचे आव्हान वन विभागासमोर उभे ठाकले आहे.