कर्जमाफीच्या अर्जांसाठी शेतकर्यांचे ‘जागरण’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:24 IST2017-09-05T01:23:43+5:302017-09-05T01:24:53+5:30
पीक कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, शेवटच्या अवघ्या १0 दिवसांत अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, सदर प्रक्रियेत ‘सर्व्हर डाउन’ची समस्या बळावली असून, प्रत्येकी केंद्रावर दिवसभरात केवळ १0 ते १२ च अर्ज ‘अपलोड’ होत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे हातचे सर्व काम सोडून अर्ज करण्यासाठी येणार्या शेतकर्यांना तांत्रिक अडचणींमुळे आपले सरकार सेवा केंद्रांवरच जागरण करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

कर्जमाफीच्या अर्जांसाठी शेतकर्यांचे ‘जागरण’!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पीक कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर असून, शेवटच्या अवघ्या १0 दिवसांत अर्ज सादर करण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, सदर प्रक्रियेत ‘सर्व्हर डाउन’ची समस्या बळावली असून, प्रत्येकी केंद्रावर दिवसभरात केवळ १0 ते १२ च अर्ज ‘अपलोड’ होत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे हातचे सर्व काम सोडून अर्ज करण्यासाठी येणार्या शेतकर्यांना तांत्रिक अडचणींमुळे आपले सरकार सेवा केंद्रांवरच जागरण करावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यात ३४६ आपले सरकार सेवा केंद्र, १३३ महा ई-सेवा केंद्र आणि ३0९ बायोमेट्रिक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागात कर्जमाफीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. मात्र, नेट कनेक्टिव्हिटी नसणे, सर्व्हर डाउन असणे यासह इतर तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच आधार कार्ड क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्न (लिंक) असणे गरजेचे आहे; परंतु अनेकजण यापासून अनभिज्ञ असल्याने त्यांना कर्जमाफीचा अर्ज सादर न करताच परतावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ऑनलाइन अर्जात हास्यास्पद प्रश्न!
पीक कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जात एका ठिकाणी ‘तुम्हाला कर्जमाफी हवी अथवा नाही’, असा हास्यास्पद प्रश्न विचारण्यात आला आहे. यादरम्यान चुकीने ‘नाही’ या पर्यायावर ‘क्लिक’ झाल्यास पात्र असणारे शेतकरीही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात. वास्तविक पाहता, आपले सरकार अथवा महा ई-सेवा केंद्रांवर कर्जमाफी मिळावी, यासाठीच शेतकरी जात असताना अर्जामध्ये असा प्रश्न विचारण्याचे नेमके कारण काय, असा सवाल शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे.