ग्रामपंचायतींच्या खातेक्रमांकाअभावी तंटामुक्तीच्या खर्चाचा निधी धूळ खात!
By Admin | Updated: April 17, 2017 01:23 IST2017-04-17T01:23:18+5:302017-04-17T01:23:18+5:30
वाशिम- जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या शेकडो ग्रामपंचायतींनी अद्याप त्यांचे खाते क्रमांकच सादर केले नसल्याने या ग्रामपंचायतींचा निधी धूळ खात पडून आहे.

ग्रामपंचायतींच्या खातेक्रमांकाअभावी तंटामुक्तीच्या खर्चाचा निधी धूळ खात!
वाशिम जिल्ह्यातील वास्तव: सात पोलीस स्टेशनचे अहवाल प्रलंबित
वाशिम: शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या तंटामुक्त गाव मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून तंटामुक्त समित्यांना स्टेशनरीच्या खर्चासाठी निधी पुरविण्यात येतो. हा निधी गृहविभागाकडून ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात येतो; मात्र जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या शेकडो ग्रामपंचायतींनी अद्याप त्यांचे खाते क्रमांकच सादर केले नसल्याने या ग्रामपंचायतींचा निधी धूळ खात पडून आहे.
गावातील तंटे गावातच मिटवून शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने २००७ मध्ये तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी गाव तंटामुक्त मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या सुयोग्य अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावपातळीवर तंटामूक्त समित्यांची नियुक्ती करण्यात आली. या समित्यांमार्फत गावातील वाद, तंटे सामोपचाराने मिटविण्यासह वादास कारणीभूत असलेल्या मुद्यांवर नियंत्रण ठेवणे, सामाजिक व धार्मिक उपक्रम, सण उत्सव, तसेच जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम सर्वसंमतीने आणि सर्वांच्या सहकार्याने आयोजित करण्यावर भर देण्याचे ठरले. या सर्व कामांचा अहवाल आणि माहिती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या नुसार किमान एक हजारांहून अधिक निधी शासनाकडून मंजूर करण्यात येतो. हा निधी ग्रामपंचायतच्या संयुक्त खात्यात जमा होत असल्याने पोलीस विभागामार्फत संबंधित ग्रामपंचायतींचे बँक खाते क्रमांक संकलित करण्याचे काम केले जाते.
वाशिम जिल्ह्यात सन २०१३-१४ चा निधी आधीच एक वर्ष विलंबाने अर्थात २०१४-१५ ला प्राप्त झाला. या निधीच्या खातेनिहाय वितरणासाठी पोलीस प्रशासनाकडून ग्रामपंचायतींकडे खाते क्रमांक मागविण्यात आले; परंतु आता दोन वर्ष झाले तरी, मंगरुळपीर, मानोरा, वाशिम ग्रामीण, मालेगाव, शिरपूर, जऊळका आणि धनज बु. या पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एकूण ३१५ ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींनी अद्याप आपले खाते क्रमांक पोलीस प्रशासनाकडे सादर केले नसल्याने त्यांचा निधी धूळ खात पडून आहे. आता या सर्व ग्रामपंचायतींनी खाते क्रमांक सादर केल्यानंतर त्यांच्या खात्यात निधी जमा केल्याशिवाय आपल्या पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींचा अहवाल पाठविणे पोलीस प्रशासनाला शक्य नसल्याने उपरोक्त सात पोलीस स्टेशनचे या संदर्भातील अहवालही प्रलंबित आहेत.
शासनाच्या वतीने तंटामुक्त गाव अभियानात विविध कामकाजासाठी स्टेशनरीकरिता येणारा निधी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात येतो. त्यासाठी ग्रामपंचायतींनी आपले खाते क्रमांक त्वरित संबंधित पोलीस स्टेशनकडे सादर करायला हवेत. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अद्याप खाते क्रमांक सादर केले नाहीत.
-प्रशांत होळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम