मृतकाची ओळख पटली; आता आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 20:06 IST2021-09-13T20:06:44+5:302021-09-13T20:06:49+5:30
Crime News : माधव यशवंत पवार, रा. नागपूर असे मृतकाचे नाव आहे.

मृतकाची ओळख पटली; आता आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान!
वाशिम : बंदुकीच्या गोळ्या झाडून एका ३२ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पांगरी कुटे (ता. मालेगाव) गावानजीकच्या शेतात १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. मालेगाव पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या १२ तासात मृतकाची ओळख पटविण्यात यश मिळविले असून, आता आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. माधव यशवंत पवार, रा. नागपूर असे मृतकाचे नाव आहे.
पांगरीकुटे शेत शिवारात रस्त्यालतच्या एका शेतात अंदाजे ३३ वर्षीय इसमाचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांना मिळाली. या माहितीच्या आधारे आपल्या ताफ्यासह ठाणेदार धुमाळ यांनी घटनास्थळ व मृतदेहाची पाहणी केली. मृतक अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. तपासाची चक्रे जलदगतीने फिरवित मालेगाव पोलिसांनी अवघ्या १२ तासातच मृतकाची ओळख पटविली. माधव यशवंत पवार, थ्री स्टार हाऊसिंग सोसायटी, साईबाबा नगर खरबी हनुमान नगर नागपूर असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून, वृत्त लिहिस्तोवर नातेवाईक मालेगावकडे रवाना झाले नव्हते.