खासदार-आमदारांमधील वादात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:49 IST2021-02-01T05:48:55+5:302021-02-01T05:49:16+5:30

Crime News : २६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात वाद झाला हाेता. दोघांनी शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले

Crimes filed against activists in dispute between MPs and MLAs | खासदार-आमदारांमधील वादात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

खासदार-आमदारांमधील वादात कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल

वाशिम : येथील नियोजन भवनात खासदार भावना गवळी आणि आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांविरुद्ध ७ दखलपात्र, तर अदखलपात्र स्वरूपाचे ४ गुन्हे दाखल केले, तसेच ७४ जणांना स्वघरी स्थानबद्ध करण्याचा आदेश देण्यात आला असून, २१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी रविवारी स्पष्ट केले.

२६ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवनात खासदार गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात वाद झाला हाेता. दोघांनी शहर पोलीस स्टेशनला परस्परविरोधी तक्रारी दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, लोकप्रतिनिधींमधील या शाब्दिक वादाचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या आदेशानुसार वाशिम, कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ७४ इसमांना स्थानबद्ध करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. या प्रकरणात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी एकतर्फी आदेश देऊन ७४ इसमांना स्वघरी स्थानबद्धतेचे आदेश दिला. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध सध्याच्या दाखल गुन्ह्यांवरून हद्दपारी, मकोका आदी कडक कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या आहेत. पोलीस स्टेशन स्तरावरून प्रतिबंधात्मक कार्यवाहीचे प्रस्ताव मागवून २१० जणांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Crimes filed against activists in dispute between MPs and MLAs