कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST2021-09-13T04:40:26+5:302021-09-13T04:40:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कोरोना होऊन गेल्यानंतर नेत्र, हर्निया, अपेंडिक्स यासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया नेमक्या कधी करायच्या, याबाबत ...

Corona passed away; When to have surgery for other ailments? | कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी?

कोरोना होऊन गेला; इतर आजारावरील शस्त्रक्रिया करायची कधी?

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : कोरोना होऊन गेल्यानंतर नेत्र, हर्निया, अपेंडिक्स यासह अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया नेमक्या कधी करायच्या, याबाबत नागरिकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे. कोरोनातून पूर्णत: बरे झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या शस्त्रक्रिया कराव्यात, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

कोरोनामुळे आरोग्याच्या विविध समस्यांबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण गत एका वर्षापासून आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर अन्य आजारांच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या? असा एक प्रश्न काही रुग्णांकडून विचारला जात आहे. कोरोना झाल्यानंतर फुफ्फुसांचे कार्य सुरळीत होईपर्यंत तरी रुग्णांनी थांबावे, यात किमान दीड महिन्यांचा कालावधी द्यावा, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांमधून व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत काही कालावधीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही प्रभावित झाला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही पूर्ववत झाला असून, नियमित सर्व शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

०००००

कोरोनाचे एकूण रुग्ण ४१७३१

बरे झालेले रुग्ण ४१०७८

एकूण कोरोना बळी ६३८

सध्या उपचार सुरू असलेले १४

.................

शस्त्रक्रियेसाठी दीड महिना वाट पाहा

कोरोनामुळे फुफ्फुस पूर्वीच्या तुलनेत थोडे कमजोर होते. फुफ्फुसावर परिणाम होत असल्याने कोरोनानंतर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असल्यास रुग्णाचे फुफ्फुस हे सुरळीत काम करणारे हवे अन्यथा शस्त्रक्रियेदरम्यान भूल दिल्यानंतर गुंतागुंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. किमान दीड महिन्याचा कालावधी जाणे आवश्यक आहे. रुग्ण हा पूर्णत: स्वस्थ झाल्यानंतर शस्त्रक्रियेतील गुंतागुंत वाढत नाही, असे सर्जन डॉ. नीलेश बढे यांनी सांगितले.

०००००

इमर्जन्सी शस्त्रक्रिया

महिलांचे सिझेरियन, ॲपेंंडिक्स फुटणे, पोटाला अचानक मार लागणे, डोक्याला गंभीर इजा आदी बाबी या इमर्जन्सी शस्त्रक्रियेत मोडतात. अशा स्थितीत रुग्णाला भूल दिल्यानंतर विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. यात रुग्णांची प्रतिकारक्षमता कमी झालेली असते. कोरोना झालेला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे महत्त्वाचे ठरते.

००००

प्लान शस्त्रक्रिया

नियोजित शस्त्रक्रियांमध्ये गर्भपिशवी, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हर्निया आदी काही शस्त्रक्रियांचा समावेश आहे. मात्र, या शस्त्रक्रियाही अधिक काळ लांबल्यास रुग्णाला त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. हर्नियाच्या रुग्णाने जड वस्तू उचलू नये, खोकला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

०००००

कोट

जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया नियमित पूर्ववत झाल्या आहेत. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी विशेष काळजी घ्यायला हवी. आग्रह न धरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या शस्त्रक्रिया करायला हव्या.

- डॉ. मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

Web Title: Corona passed away; When to have surgery for other ailments?