ओबीसी आरक्षणासाठी कॉंग्रेस, भाजपाचे वाशिम जिल्ह्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 18:41 IST2021-06-26T18:41:41+5:302021-06-26T18:41:47+5:30
Agitation in Washim district for OBC reservation : आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव येथे भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

ओबीसी आरक्षणासाठी कॉंग्रेस, भाजपाचे वाशिम जिल्ह्यात आंदोलन
वाशिम : राज्यात सत्तारूढ असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आले, असा आरोप करत या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने २६ जून रोजी जिल्ह्यात आंदोलन केले. दुसरीकडे केंद्र सरकार व तत्कालिन फडणवीस सरकारच्या दुर्लक्षामुळे ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळाले नाही असा आरोप करीत केंद्र सरकारने ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, या मागणीसाठी कॉंग्रेसच्यावतीने २६ जून रोजी जिल्ह्यात आंदोलन केले.
२६ जून रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा, रिसोड आणि मालेगाव येथे भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीसांनी शेकडो आंदोलकांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली. याच मागणीच्या अनुषंगाने केंद्र सरकारवर तोफ डागत कॉंग्रेसच्यावतीने आमदार अमित झनक, जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वात वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, कारंजा व मालेगाव येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.