BJP-Sena government misleads the people - Nana Patole | खोटारड्या भाजपा-सेना सरकारने जनतेची केली दिशाभूल - नाना पटोले
खोटारड्या भाजपा-सेना सरकारने जनतेची केली दिशाभूल - नाना पटोले


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम /कारंजा : जनतेला खोट्या आश्वासनांच्या झुल्यावर झुलवून गत पाच वर्षात अक्षरश: लूट करणाऱ्या खोटारड्या भाजपा-शिवसेना सरकारने राज्यभरातील जनतेची दिशाभूल केली, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नाना पटोले यांनी केला. अशाच काही चुकीच्या कामांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सरकारचे वस्त्रहरण करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कॉंग्रेसकडून आयोजीत महापदार्फाश यात्रेचे कारंजा व वाशिम येथे ३ सप्टेंबर रोजी आगमन झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँंग्रेस कमेटीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकुर, आमदार वझाहत मिर्झा, प्रकाशराव साबळे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक, दिलीप भोजराज यांच्यासह जिल्हायातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाशिम व कारंजा येथे झालेल्या महा पर्दापफाश सभेत नाना पटोले म्हणाले, एसटी बसने महाराष्ट्रातील ६७ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. ते प्रत्येकी एक रूपया विम्यापोटी शासनाकडे भरतात, म्हणजेच सरकारकडे ६७ लाख रुपये रोज जमा होतात. त्या रकमेचे नेमके काय केले जाते, याचे उत्तर युती सरकारला अद्यापपर्यंत देता आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या सरकारने लुट सुरू केली असून, शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत राबविली. आता काही दिवसात आचारसंहिता लागणार मग भरतीचे काय, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारकडून जनतेला फसवण्याचे काम सुरू असून, हे सरकार शेतकरी विरोधी, भुलथापा मारणारे असल्याचे मत नाना पटोले यांनी व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाजनादेश' यात्रेतून करण्यात येत असलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसने ही यात्रा काढली असल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच सत्तर वर्षाच्या इतिहासात प्रथमच एवढे खोटारडे पंतप्रधान व मुख्यमंत्री पाहिले नाहीत. ज्या प्रश्नांवर सत्ता मिळविली ते प्रश्न बाजुला ठेवून इतर प्रकरणे समोर करुन भाजपा सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे.


भाजप पक्ष संपूर्ण काँग्रेस-राष्टÑवादीमय झाला - ठाकुर
भाजपा सरकार खोटारडे सरकार असून लोकांची दिशाभूल करीत आहे. भाजपा हिंदू राष्टÑ निर्माण करायचे आहे म्हणतेय मग इतर लोकांनी कुठ जायचं असा प्रश्न करीत त्यांच्या पक्षात दमदार नेतृत्व नसल्याने ते अन्य पक्षातील लोकांची आयात करीत आहेत. यामुळेच भाजपा संपूर्ण काँग्रेस-राष्टÑवादीमय झाल्याचे यशोमती ठाकुर म्हणाल्यात.


नेत्यांना भीती दाखवून भाजपात प्रवेश करण्यास पाडताहेत भाग- ठाकरे
भाजपामध्ये विविध पक्षाचे नेते प्रवेश करीत आहेत. ते स्वताहून नव्हे तर त्यांना तुम्ही आले नाही तर तुमचे प्रकरण पुढे येईल अशी भीती दाखविण्यात येत आहे. तर काही जण आपला स्वार्थ पाहून जात असल्याचे माणिकराव ठाकरे भाषणात म्हणाले.

Web Title: BJP-Sena government misleads the people - Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.