दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना
By सुनील काकडे | Updated: March 15, 2024 20:10 IST2024-03-15T20:09:45+5:302024-03-15T20:10:12+5:30
भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.

दुचाकीची जबर धडक! ५५ वर्षीय इसम ठार; कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील घटना
वाशिम: भरधाव दुचाकीने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना १५ मार्च रोजी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास कारंजा-मंगरूळपीर मार्गावरील शिक्षक कॉलोनीनजिक घडली. बाबाराव नामदेव डोंगरे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मोऱ्हळ येथील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मृतक डोंगरे हे पायदळ रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकी वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यामुळे ते रस्त्यावर खाली कोसळले आणि त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरु झाला.
रुग्णवाहिका चालक श्याम घोडेस्वार यांनी तातडीची मदत पुरवत डोंगरे यांना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुचाकी वाहनावरील पती-पत्नी देखील या घटनेत जखमी झाले. मात्र, त्यांची नावे कळू शकली नाही. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.