आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 14:17 IST2018-08-12T14:16:19+5:302018-08-12T14:17:30+5:30
आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार.

आसेगाव बांध सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलाच
रब्बी हंगामात जाणवणार अडचण : मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाने दडी मारल्यामुळे खरिपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांची पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे दिसत आहे. परिसरातील आसेगाव बांध सिंचन प्रकल्पातही आजमितीस केवळ ४० टक्के जलसाठा असून मोठा पाऊस होवून प्रकल्प न भरल्यास आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई भेडसावणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
आसेगाव बांध सिंचन प्रकल्पावर आसेगाव परिसरातील शेकडो शेतकरी उपसा सिंचन पद्धतीने पिकांच्या सिंचनासाठी पाणी घेतात. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत: तुडूंब भरणे अत्यावश्यक आहे. मात्र, गतवर्षी घटलेले पर्जन्यमान आणि यंदाही तशीच स्थिती उद्भवल्याने आजमितीस प्रकल्पात केवळ ४० टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पिकांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न भेडसावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मुग, उडीद ही पिके सुकत चालली आहेत. येत्या चार ते पाच दिवसांत मोठा पाऊस झाला नाही खरीपाच्या सरासरी उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, ज्या शेतकºयांकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी सुक्ष्म सिंचन पद्धतीने पिके वाचविण्याची धडपड चालविल्याचे दिसून येत आहे.