खतांचा मुबलक साठा; तरीही कृत्रिम टंचाईचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:56+5:302021-05-27T04:42:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार ३९ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे तर दुसरीकडे काही ...

Abundant stocks of fertilizers; Still trying artificial scarcity! | खतांचा मुबलक साठा; तरीही कृत्रिम टंचाईचा प्रयत्न !

खतांचा मुबलक साठा; तरीही कृत्रिम टंचाईचा प्रयत्न !

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या अहवालानुसार ३९ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे तर दुसरीकडे काही विशिष्ट खतांची कृत्रिम टंचाई भासविण्याचा प्रयत्नही विक्रेत्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी विभागाची भरारी पथके सक्रिय झाली असून, जादा दराने खतविक्री झाल्यास विक्रेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला असून, खते, बियाण्यांची खरेदी करण्याकडे शेतकरी वळत आहेत. यंदा विशेषत: डीएपी खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. खताच्या किमती कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून झाल्यानंतर अनुदानात वाढ करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता डीएपी खत हे १,२०० रुपयांत उपलब्ध झाले आहे. विविध कंपन्या व ग्रेडनिहाय खतांच्या किमती जाहीर झाल्या असून, या दरानेच शेतकऱ्यांना खत उपलब्ध व्हावे, याकरिता कृषी विभाग सज्ज झाला आहे. खतांच्या किमती व विक्री यासंदर्भात शेतकऱ्यांची फसगत होऊ नये म्हणून सात भरारी पथकांनी जिल्हाभर दौरे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. त्यानुसार कृषी विभागाने भरारी पथकातील सदस्यांचे संपर्क क्रमांक तसेच दरपत्रक कृषी सेवा केंद्रात दर्शनी भागात लावण्याच्या सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या ३९ हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनीही कंपनीनिहाय व ग्रेडनिहाय जाहीर केलेल्या दराप्रमाणेच रासायनिक खताची खरेदी करावी तसेच रासायनिक खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, असे आवाहन केले. दरम्यान, अन्य खतांच्या तुलनेत आता डीएपी खताचे दर कमी झाल्याने या खताला मागणी वाढली आहे. जिल्ह्यात सध्या १,५०० मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध आहे. मात्र, वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर येथे डीएपी खताची कृत्रिम टंचाई भासवली जात असल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

०००००००

अशा आहेत खतांच्या किमती

खत प्रकार किमती

डीएपी १२००

१०.२६.२६ ११७५ - १३९०

१२.३२.१६ ११८५ - १३७०

२०.२०.०.१३ ९७५ - ११५०

१९.१९.१९ १५७५

२८.२८.० १४५० - १४७५

१४.३५.१४ १३६५ - १४००

२४.२४.०.८ १४५० - १५००

१५.१५.१५.०९ ११०० - ११५०

१६.२०.०.१३ १०००

००००००००००००

उपलब्ध खत साठा (मेट्रिक टनमध्ये)

खत प्रकारविक्रीशिल्लक साठा

युरिया ११३१ ४७४५

डीएपी १४७७ १५९४

एमओपी १२३ १०५१

एसएसपी ३०२९ १२१७०

संयुक्त खते ३५६९ १९९९०

००००००

बॉक्स

खरेदीची पावती घ्यावी !

खताच्या किमतीबाबत फसगत होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, त्यावरुन रासायनिक खताच्या किमतीची पडताळणी करता येईल. खताच्या खरेदीची पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, भेसळीची शंका दूर करण्यासाठी खताची पाकिटे व गोणी सीलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावी, कृत्रिम खतटंचाई भासविणाऱ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

००००००

कोट

खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कृषीनिविष्ठांसंदर्भातील अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर (१८००२३३४०००) संपर्क साधावा. खत, बियाण्यांसंदर्भात काही अडचण असल्यास नजीकच्या कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी किंवा सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

- व्ही. एस. बंडगर,

कृषी विकास अधिकारी

०००००

कोट

कंपनीने जाहीर केलल्या ग्रेडनिहाय खताच्या किमतीपेक्षा जादा दराने कोणत्याही कृषी सेवा केंद्र संचालकाने विक्री करु नये अन्यथा त्याचा खत परवाना खत नियंत्रण आदेशान्वये रद्द केला जाईल. शेतकऱ्यांनी किमतीविषयी अथवा खताविषयी शंका, अडचण असल्यास तत्काळ कृषी विभागाकडे संपर्क साधावा.

- शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Abundant stocks of fertilizers; Still trying artificial scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.