चक्क बोटीच्या इंजिनमध्ये घुसला अजगर, बोट चालकाची उडाली धांदल
By दादाराव गायकवाड | Updated: August 30, 2022 18:47 IST2022-08-30T18:46:03+5:302022-08-30T18:47:37+5:30
बोटमध्ये साप निघाल्याच्या या घटनेची माहिती काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य चे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी तत्काळ वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकातील सर्पमित्र प्रविण गावंडे याला दिली

चक्क बोटीच्या इंजिनमध्ये घुसला अजगर, बोट चालकाची उडाली धांदल
वाशिम : काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथे असलेल्या बोटीच्या इंजिनमध्येच अजगराच्या पिलाने बस्तान मांडल्याचा प्रकार मंगळवार ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आला. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो पथकातील सदस्यांनी या अजगराला बाहेर काढत जीवदान दिले. काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातील कर्मचारी प्रेम खंडारे व अक्षय डाखोरे यांना तेथील बोटीच्या इंजिनमध्येच एक साप आढळून आला.
बोटमध्ये साप निघाल्याच्या या घटनेची माहिती काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य चे वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी तत्काळ वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकातील सर्पमित्र प्रविण गावंडे याला दिली. प्रविण गावंडे हा तत्काळ सहकारी आदित्य इंगोले व ज्ञानेश्वर खडसे यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाला. पाहणी केली असता बोटीच्या इंजिनमध्ये अजगराचे ३ फुट लांबीचे पिलू आढळून आले. आदित्य इंगोले, प्रविण गावंडे यांनी अथक परिश्रमानंतर या अजगराच्या पिलास सुरक्षितपणे बाहेर काढून काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यातील निसर्ग अधिवासात मुक्त केले.