११ बॅरेज तुडूंब; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:29 IST2019-09-09T14:29:04+5:302019-09-09T14:29:10+5:30
नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी दिला.

११ बॅरेज तुडूंब; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पैनगंगा नदीवरीलवाशिम जिल्ह्यातील सर्व ११ बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले असून, यानंतर मोठा पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी दरवाजे उघडले जाऊ शकतात. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी दिला.
वाशिम जिल्ह्यात पैनगंगा नदीवर उकळी, अडगाव, गणेशपुर, कोकलगाव, ढिल्ली, जुमडा, राजगाव, टनका, जयपूर, सोनगव्हाण यासह एकूण ११ बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. परंतू, पैनगंगा नदीपात्र परिसरात अन्य जिल्ह्यात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बॅरेजमध्ये बऱ्यापैकी जलसाठा झाला. गत दोन दिवसात तर पैनगंगा नदीवरील सर्व ११ बॅरेज पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे यानंतर मोठा पाऊस होऊन जलसाठा वाढल्यास बॅरेजचे दरवाजे कोणत्याही वेळी उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे. या पृष्ठभूमीवर पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जावू नये, अथवा आपली जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असा इशारा वाशिम पाटबंधारे विभागाने दिला आहे.
(प्रतिनिधी)