प्रारूप मतदार यादीतील घोटाळ्या विरुद्ध न्यायालयात जाणार - मुझफ्फर हुसैन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:02 IST2025-11-28T21:01:40+5:302025-11-28T21:02:20+5:30
शुक्रवारी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची मुझफ्फर यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रारूप मतदार यादीतील घोळ विरुद्ध तक्रारी केल्या.

प्रारूप मतदार यादीतील घोटाळ्या विरुद्ध न्यायालयात जाणार - मुझफ्फर हुसैन
मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील घोटाळ्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाच्या संगनमताने गेल्या पालिका निवडणूक मतदार यादीत देखील घोटाळा केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत केला.
शुक्रवारी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची मुझफ्फर यांच्यासह काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेऊन प्रारूप मतदार यादीतील घोळ विरुद्ध तक्रारी केल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत सह माजी नगरसेवक अनिल सावंत, जुबेर इनामदार, राजीव मेहरा, महिला जिल्हाध्यक्षा रूपा पिंटो, आफरीन सय्यद, वेलेरिन पांड्रिक, सिद्धेश राणे, दीपक बागरी, रवींद्र खरात आदी सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकी पर्यंत च्या ५ - ६ महिन्यात साधारपणे ९० हजार नावे नव्याने समाविष्ट केली. त्या बाबत काँग्रेसने सातत्याने तक्रारी करून देखील निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही. करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीनंतर मिरा भाईंदर विधानसभा मतदार संघातली १८ हजार दुबार मतदार पासून ओवळा माजिवडा मध्ये राहणाऱ्या भाजपाच्या माजी महापौर, माजी नगरसेवक, पदाधिकारी आदींची नावे बेकायदा व आयोगाच्या संगनमताने सत्ताधारी पक्षांनी मीरा भाईंदर मध्ये नोंदवली व मतदान केले. त्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे असे मुझफ्फर म्हणाले.
पालिकेच्या प्रारूप प्रभाग मतदार यादी मधील चुका निदर्शनास आणून देत आयुक्तांशी चर्चा केली. प्रारुप मतदार यादी मध्ये दुबार मतदार, फोटो नसलेले मतदार, मृत मतदार, स्थलांतरित मतदार, रहात नसलेले मतदार आदींची नावे वगळण्यात आलेली नाहीत. एका एका प्रभागातील शेकडो व काही हजार मतदारांची नावे अन्य प्रभागात टाकण्यात आली आहेत. प्रत्येक यादी मध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ, चुका, त्रुटी,अनियमितता आहे. म्हणूनच आम्ही प्रभाग निहाय आक्षेप घेत सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये आताच्या प्रारूप यादीत प्रभाग १२, १४, १८, १५, १६ येथील सुमारे साडेतेरा हजार नावे टाकली आहेत. प्रभाग ९ मध्ये ४ हजार ६०० नाव अन्य भागातले आहेत. काही प्रभागात मतदारांची यादीच गहाळ केली आहे. असे प्रत्येक प्रभागात आहे. काँग्रेस पदाधिकारी जय ठाकूर यांचे तर धर्मांतरण आयोगाने करून टाकले आहे. फोटो ठाकूर यांचा तर नाव, पत्ता युसूफ खान असे टाकले आहे. महापालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाच्या इशाऱ्यावर महापालिकेने हे सर्व घोळ - घोटाळे केले असल्याचा आरोप मुझफ्फर यांनी केला.