Virar-Alibag: विरार-अलिबाग मार्गिका ठरणार 'गेम चेंजर'; ठाणे, कल्याण, नवी मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:38 IST2025-11-20T12:37:39+5:302025-11-20T12:38:27+5:30
ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करार (बीओटी) तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच राज्य सरकारकडे मागितली.

Virar-Alibag: विरार-अलिबाग मार्गिका ठरणार 'गेम चेंजर'; ठाणे, कल्याण, नवी मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबईतीलवाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतिक्षित विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिकेचे काम बांधा वापरा हस्तांतरित करार (बीओटी) तत्वावर करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच राज्य सरकारकडे मागितली. त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एमएसआरडीसीने या महामार्गाच्या कामासाठी यापूर्वी निविदा काढल्या होत्या. मात्र त्या निविदा ३६ टक्के अधिक दराने आल्या होत्या. तसेच त्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी या निविदा रद्द करून हा प्रकल्प बीओटीवर राबविण्याची सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने प्रकल्प बीओटी तत्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या निविदेच्या अटी शर्ती मंजुरीसाठी सरकारकडे पाठविल्या आहे.
मोरबे-करंजाडे मार्गाचे काम दोन वर्षात पूर्ण
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरून आलेल्या वाहनांना थेट जेएनपीटीला पोहचता येणार आहे. मात्र या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा मोरबे ते करंजाडे हा २१ किमी लांबीचा मार्ग विरार-अलिबाग महामार्गासोबत एकत्र उभारला जाणार आहे. एमएसआरडीसी या २१ किमी मार्गाचे काम करणार आहे. मात्र सध्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचे राज्यातील ८० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मोरबे ते कंरजाडे मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट निविदेत घातली जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
महामार्ग ठरणार ‘गेम चेंजर’
विरार-अलिबाग हा ९६.५ किमी लांबीचा बहुद्देशीय मार्ग मुंबई महानगरातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असेल. एमएसआरडीसी तो उभारणार असून ५३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. वसई येथील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून तो सुरू होईल. तर पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान हा मार्ग असेल. त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ४ मार्गिका उभारल्या जाणार असून मुंबई आणि दिल्ली एक्स्प्रेसवेचा काही भाग आणि हा महामार्ग एकत्रित जाणार आहे. या भागात रस्त्यावर प्रत्येकी एका दिशेच्या वाहतुकीसाठी ६ मार्गिकांचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यातून मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल. मार्गाच्या कामासाठी आलेल्या निविदापत्राची पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी नेमलेल्या समितीकडून तपासणी सुरू आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर एमएसआरडीसीकडून निविदा काढल्या जाणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.