मालकाला बेदम मारहाण अन् लाखो रुपयांचे दागिने घेऊन झाले फरार; वसईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 17:52 IST2025-01-11T17:49:10+5:302025-01-11T17:52:29+5:30
वसईतील एका ज्वेलर्सवर दोघांनी सशस्त्र दरोडा टाकला. सराफा व्यावसायिकाला बेदम मारहाण करत हल्लेखोर लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले.

मालकाला बेदम मारहाण अन् लाखो रुपयांचे दागिने घेऊन झाले फरार; वसईतील घटना
-मंगेश कराळे, नालासोपारा
वसईच्या कौल हेरिटेज सिटी येथील लोटस बिल्डिंगमध्ये असलेल्या मंयक ज्वेलर्सवर शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालण्यात आला. दोन हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सराफ दुकानाचे मालक रतनलाल संघवी यांना बेदम मारहाण केली. दुकानातील ४५ लाखांचे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके स्थापन केली आहे. जखमी संघवी यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मयंक ज्वेलर्स या दुकानात मालक रतनलाल संघवी (६९) आणि त्यांचा मुलगा मनिष संघवी हे असतात. शुक्रवारी मनिष संघवी कामानिमित्ताने बाहेर गेला होता. रात्री सव्वा नऊच्या सुमारास रतनलाल संघवी दुकान बंद करण्याच्या तयारीत होते.
दोघे दुकानात घुसले अन्...
संघवी दागिने असलेले ट्रे कपाटात ठेवत होते. त्यावेळी दोन सशस्त्र हल्लेखोर दुकानात शिरले. दुकानात शिरताच त्यांनी संघवी यांच्यावर हल्ला केला. त्यांनी बंदुकीच्या दट्टयाने संघवी यांना मारहाण करण्यास सुरवात केली.
संघवी यांना आतल्या खोलीत डांबले आणि दागिन्यांचा ट्रे घेऊन पसार झाले. हल्लेखोरांपैकी एकाने डोक्यात हेल्मेट घातले होते तर दुसर्याने मुखपट्टी (मास्क) लावून चेहरा झाकला होता.
सराफा व्यावसायिक गंभीर जखमी
या हल्ल्यात संघवी प्रचंड जखमी झाले आहे. मात्र आता त्यांची परिस्थितीत आता स्थिर आहे. या लुटीच्या घटनेमुळे परिसरातील सराफ मालक आणि दुकानदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. परिसरात पोलीस चौकी उभारावी अशी मागणी परिसरातील दुकानदारांनी केली आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
दोघे हल्लेखोर अचानक सराफ दुकानात शिरले आणि त्यांनी बंदूकसदृश्य वस्तूने संघवी यांना मारहाण करत लुट केली आहे. या लुटीत आणखी आरोपी असू शकतील. आम्ही सर्व ६ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकांमार्फत तपास करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. हल्ल्यापूर्वी रेकी केली असण्याची शक्यता आहे, अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली.