निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांच्या शालेय कामकाजाचे बिघडले गणित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:47 IST2026-01-04T13:47:03+5:302026-01-04T13:47:03+5:30
पालघर जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये नाराजी

निवडणुकीच्या कामांमुळे शिक्षकांच्या शालेय कामकाजाचे बिघडले गणित
लोकमत न्यूज नेटवर्क, कुडूस : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या निवडणूक कामाच्या वर्गवारीबाबत प्रशासनाकडून वेळेत आणि स्पष्ट माहिती न मिळाल्याने पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. अगोदर दिलेले आदेश वारंवार बदलण्यात आल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या असमन्वयावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी शिक्षकांची नेमणूक करताना कोणत्या शिक्षकाला, कोणत्या स्वरूपाचे काम देण्यात येणार आहे, याबाबत ठोस व स्पष्ट निर्देश नसल्याने अनेक शिक्षकांना तहसील व महापालिका कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही शिक्षकांना अगोदर एका प्रकारचे काम देण्यात आले, नंतर त्यात बदल करून वेगळेच काम सोपविण्यात आले. या विचित्र आदेशांमुळे शिक्षकांची वैयक्तिक तसेच शालेय कामांची गणिते पूर्णपणे बिघडली आहेत.
शिक्षकांवर आधीच अध्यापनाचे मोठे ओझे आहे. शाळेतील अध्यापन, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासह इतर अनेक जबाबदारी शिक्षक पार पाडत असतात. त्यातच निवडणूक कामामुळे शिक्षकांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे.
प्रशासनाचा असमन्वय, शिक्षक संघटनेचा आरोप
अतिरिक्त ताणाचा थेट परिणाम अध्यापनावर होत असून काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे अपेक्षित लक्ष देता येत नसल्याची खंत शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
शिक्षणाचा दर्जा खालावण्याची भीती व्यक्त होत असताना प्रशासनाकडून मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. प्रशासनाने निवडणूक कामाचे नियोजन वेळेत, पारदर्शक आणि समन्वयाने केले असते, तर शिक्षकांना हा त्रास सहन करावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया शिक्षक संघटनांकडून देण्यात येत आहे.