वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:57 IST2025-10-29T07:56:07+5:302025-10-29T07:57:05+5:30
मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या निलंबनामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ
मंगेश कराळे
नालासोपारा :- मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नालासोपारा येथे अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणला होता. या कारवाईनंतर स्थानिक पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शनिवारी टिळक नगर पोलीस आणि गुन्हे शाखा ६ च्या पथकाने महामार्गाजवळ असेलल्या रशिद कंपाऊंडमध्ये सुरू असेलला अंमली पदार्थांचा कारखाना उध्दवस्त केला होता. यावेळी १४ कोटींचे एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. पेल्हार पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या गाळ्यात छुप्या पध्दतीने हा कारखाना सुरू होता. यामुळे मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तडकाफडकी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना सेवेतून निलंबित केले आहे.
पोलीस दलात खळबळ
हा कारखाना जरी ६ महिन्यांपूर्वी सुरू झाला असली तर तो पत्र्याच्या शेडमधील गाळ्यात छुप्या पध्दतीने सुरू होता. रासायनिक पदार्थ तयार केले जात असल्याचे भासविण्यात आले होते. प्रत्यक्षात रात्रीच्या वेळी अंमली पदार्थ बनविण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. आरोपींनीही स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात लागेबांधे असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकार्याला जबाबदार धरून निलंबित केल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ कारखाना सुरू असल्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती नसणं हे अपयश आहे. परंतु त्या कारखान्याशी प्रत्यक्ष काही संबंध नसताना निलंबन करण्याची कारवाई ही अन्यायकारक असल्याचं मत अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी व्यक्त केलं आहे. आमच्या हद्दीत अनेक रासायनिक पदार्थांचे कारखाने आहेत. त्या प्रत्येकाची तपासणी करणे शक्य नाही आणि तसा थेट अधिकारही नाही, असे एका पोलीस अधिकार्याने सांगितले.
पेल्हारला सचिन कांबळे यांची नियुक्ती
जितेंद्र वनकोटी यांचे सोमवारी रात्री सेवेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी अंमली पदार्थ विरोधी एक कक्षाचे प्रमुख सचिन कांबळे यांची पेल्हार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे फेरबदल
मंगळवारी पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानुसार सहा पोलिस अधिकाऱ्यांचे फेरबदल केल्याची ऑर्डर करण्यात आली. मांडवीचे वपोनि संजय हजारे यांची नायगांव पोलिस ठाण्यात तर नायगांवचे वपोनि विजय कदम यांची दुय्यम अधिकारीपदी पायउतार करण्यात आले आहे. पेल्हारचे पोलिस निरीक्षक दिलीप राख यांची काशिमिरा पोलिस ठाण्यात तर काशिमिऱ्याचे पोलिस निरीक्षक रणजीत आंधळे यांची मांडवीच्या वपोनि पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला अत्याचार प्रतिबंध कक्षाच्या पोलिस निरीक्षक सौरभी पवार यांची काशिमिरा पोलिस ठाण्यात नियुक्ती केली आहे.