वसईच्या केळीला आता शहापूरची टक्कर, लेनाडमध्ये प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:30 AM2020-03-01T01:30:31+5:302020-03-01T01:30:36+5:30

शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे.

Shahapur collision with Vasai banana, experiment in Lenad | वसईच्या केळीला आता शहापूरची टक्कर, लेनाडमध्ये प्रयोग

वसईच्या केळीला आता शहापूरची टक्कर, लेनाडमध्ये प्रयोग

googlenewsNext

जनार्दन भेरे 
भातसानगर : शहापूर तालुका पाणीटंचाईचा म्हणून परिचित आहे. मात्र, आता त्याची ओळख केळ्यांची लागवड करणारा म्हणून नावारूपाला येणार आहे. ठिबक सिंचनाचा वापर करून केळीलागवडीचा प्रयोग यशस्वी झाला असून पैसा देणारे हे उत्पादन आहे.
शहापूर तालुक्यातील लेनाड (बु) येथील कृषी तंत्र महाविद्यालयातील २५ एकर जागेत केळीची लागवड केली आहे. कृषी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. फुलशेती, ग्रीनहाउस, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्याची पिके घेतली. ही शेती चांगल्या प्रकारे तालुक्यात रुजल्यानंतर याच विद्यालयात मागील वर्षी पपईची लागवड यशस्वी करून दाखवल्यानंतर केळीचे उत्पादन घ्यायचे भोईर यांनी ठरवले आणि हा प्रयोगही यशस्वी झाला. आपल्याकडे वसईची केळी अधिक प्रसिद्ध आहेत.
केळीच्या लागवडीच्या प्रयोगाची जबाबदारी प्रभाकर भोईर, भैरव सोनावळे, प्राचार्य प्रकाश भांगरात, नरेंद्र वाघ, नितीन घुडे यांच्यासह १८० विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य त्यांनीच पुरविले आणि अपार मेहनत घेऊन तो प्रयोग यशस्वीही करून दाखवला. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून २५ एकर जागेत २३ हजार ६०० रोपांची लागवड म्हणजेच एकरी १२०० झाडांची लागवड केली. प्रत्येक झाडावर किमान ५०० रुपये उत्पन्न देणारे केळीचे ३० ते ३५ किलो वजनाचे घड तयार झाले असून खर्च वजा जाता एकरी सहा लाख रुपये पीक देईल, अशी अपेक्षा आहे. हे पीक २८ महिन्यांत घेता येत असून एकरी १० लाख रुपये इतके उत्पन्न देणारे ठरणारे आहे. केळ्यांची विक्र ी याच ठिकाणी केली जाणार असून जागेवरच व्यापारी येऊन ती घेऊन जाण्याची तजवीज केली जाणार आहे.
ठिबक सिंचनाचा अवलंब केल्याने एकदा गर काढून ते झाड तोडून त्याला दुबार आलेल्या रोपांपासून असे तीन वेळा उत्पादन घेता येते. त्यामुळे ते शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरणार आहे. या पिकावर हवामानाचा कोणताच वाईट परिणाम होत नाही. ज्याज्या ठिकाणी पाणी आहे, त्यात्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन प्राचार्य भांगरत यांनी केले आहे.
>कृषी तंत्र महाविद्यालयात केलेल्या शेतीतून अधिक फायदा होणार असून अशा प्रकारचे उत्पादन शेतकºयांनी घेतल्यास ते फायदेशीर ठरेल.
- विलास झुंजारराव,
कृषी अधिकारी

Web Title: Shahapur collision with Vasai banana, experiment in Lenad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.