भाईंदरच्या पाली गावात महापालिकेच्या नळातून गटाराचे पाणी; गटाराच्या घाण पाण्याने नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:35 IST2025-10-12T11:35:31+5:302025-10-12T11:35:54+5:30
गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे.

भाईंदरच्या पाली गावात महापालिकेच्या नळातून गटाराचे पाणी; गटाराच्या घाण पाण्याने नागरिक त्रस्त
मीरारोड- भाईंदरच्या पाली गाव भागात मीरा भाईंदर महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या नळां मधून चक्क गटाराचे काळेकुट्ट दुर्गंधीचे पाणी येत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेने दिखाऊगिरी साठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्या पेक्षा नागरिकांना आधी चांगले शुद्ध पाणी द्यावे. आम्ही काय गटाराचे पाणी प्यायचे का ? असा संतप्त सवाल मच्छीमारांनी केला आहे.
गेल्या काही दिवस पासून भाईंदरच्या पाली गाव आणि शांती नगर भागातील अनेक मच्छीमारांच्या घरातील महापालिका नळातून पिण्याच्या शुद्ध पाण्या ऐवजी गटाराचे काळेकुट्ट दूषित पाणी येत आहे. त्यामुळे येथील लोकं त्रासले आहेत. पाणी इतके घाण व काळे असून ते काहीच उपयोगाचे नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासह आंघोळीला, जेवण बनवायला, कपडे - भांडी धुण्यासाठी देखील पाणी विकत घ्यावे लागत आहे.
ह्या भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असून शिवाय समुद्र किनारी असल्याने लवकर खराब होतात. त्यातच महापालिकेने आधी येथे मुख्य रस्त्यावर मोठी जलवाहिनी टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले. त्या नंतर अन्य कामांसाठी रस्ता खोदकाम सुरूच आहे. महापालिका येथील मच्छीमारांच्या मूलभूत समस्या सोडवण्या कडे नेहमीच उदासीनता दाखवते. येथील डम्पिंग पासून अनेक गंभीर समस्यांनी लोकांचे जगणे मुश्किल झाल्याने पालिके विरुद्ध आधीच संताप आहे. त्यातच पालिकेच्या नळाला गटाराचे पाणी येत असल्याने नाराजी वाढली आहे.
पिंकी मिरांडा ( स्थानिक मच्छीमार) - पाली - शांती नगर भागात दुर्गंधीयुक्त ह्या दूषित पाण्याचा पुरवठा नळातून होत आहे. हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच पण घरात लादी पुसायला देखील वापरण्या सारखे नाही. पालिकेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी कधीतरी आमच्या कोळीवाड्यात येउन येथील मच्छीमारांना कसे त्रासदायक जीवन जगावे लागत आहे याचा आढावा घ्यावा.
बर्नड डिमेलो ( मच्छीमार नेते ) - नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष केले जाते. समस्या सोडवण्या ऐवजी पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी बेफिकीर व उद्धटपणे लोकांशी वागतात.