सोसायटीतील पाण्याचा वाद विकोपाला; तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात तुफान राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:49 IST2025-07-16T18:47:26+5:302025-07-16T18:49:07+5:30

नालासोपाऱ्यात सोसायटीमधील रहिवाशांची पोलीस ठाण्यात हाणामारी झाली.

Residents of a society in Nalasopara clashed at the police station | सोसायटीतील पाण्याचा वाद विकोपाला; तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात तुफान राडा

सोसायटीतील पाण्याचा वाद विकोपाला; तुळींज पोलीस ठाण्यात दोन गटात तुफान राडा

मंगेश कराळे

नालासोपारा: सोसायटीच्या पाण्याची १२०० रुपये दिले नाहीत याचा वाद विकोपाला जाऊन दोन गटातील लोकांनी एकमेकांना तुफान मारहाण केल्याची घटना तुळींज पोलीस ठाण्यात घडली आहे. सोसायटीचा वाद मिटता मिटत नसताना पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तिथेही या दोन्ही गटांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आहे. तुळींज पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. आता या दोन्ही गटातील लोकांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, प्रगती नगर येथील निलगगन अपार्टमेंटमध्ये मोहम्मद सलीम शेख व जास्मिन शेख राहतात. त्यांनी सोसायटीच्या पाण्याची बाराशे रुपये दिले नव्हते. याचा जाब विचारण्यासाठी महेश्वरी चौधरी, अरिफ शेख, त्याची बायको, मुलगा, भाचा तसेच गुलीस्ता, मुस्तफा, सलीम यांनी वाद घातला होता. यावादाचे पर्यावसन हाणामारीत झालं होतं. तेव्हा झालेल्या झटापटीत यास्मीन शेख यांची सोन्याची चेन गहाळ झाली असल्याचा आरोप तीने केला. वाद मिटायचे चिन्ह दिसत नसल्यामुळे दोन्ही गटातील लोकांनी तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र तेथेही ठाणे अंमलदाराच्या कक्षाबाहेर या दोन्ही गटातील लोकांनी फ्रीस्टाइल हाणामारी करत एकमेकांना धुतले तर महिलांनी एकमेकींच्या केसांच्या झिंज्या उपटल्या. तुळींज पोलिसांनी वेळेत मध्यस्थी करून ही हाणामारी थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी मोहम्मद सलीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात मारहाण केल्याचा तर गुलाबसा खान या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून दोन जणां विरोधात मारहाणीचा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने पोलिसांवरील धाक संपल्याचा प्रश्न उभा राहत असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान पोलिसांचा पोलीस ठाण्यात देखील धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर पोलीस ठाण्यातच असे दोन गट आपापसात भिडत असतील तर पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
 

Web Title: Residents of a society in Nalasopara clashed at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.