वीज पडून एका मुलाचा मृत्यू तर तीन मुले जखमी; डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 20:50 IST2021-06-28T20:49:31+5:302021-06-28T20:50:10+5:30
Dead : उंबराच्या झाडावर वीज पडली व ही घटना घडली.

वीज पडून एका मुलाचा मृत्यू तर तीन मुले जखमी; डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथील घटना
कासा : डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे झाडावर वीज पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर तीन मुले जखमी असून त्यापैकी एकाची स्थिती गंभीर आहे.
तालुक्यातील ओसरविरा मानकरपाडा येथे सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एका उंबराच्या झाडावर वीज पडल्याने रविन बच्चू कोरडा (१६) याचा जागीच मृत्यू झाला, तर चेतन मोहन कोरडा (११), दीपेश संदीप कोरडा (११) व मेहुल अनिल मानकर (१२) हे जखमी असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी मेहुल यास पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. ही सर्व शाळकरी मुले असून मयत रविन हा इयत्ता नववीत शिकत होता, तर इतर सहावी ते आठवीतील मुले आहेत. दरम्यान, गावात मोबाईलला रेंज नसल्याने पाड्यापासून दीड किमी अंतरावर एका उंबराच्या झाडावर काही जण मोबाईल घेऊन चढले होते, तर काही झाडाखाली खेळत होते. त्यादरम्यान या उंबराच्या झाडावर वीज पडली व ही घटना घडली.