मोबाइल तिकीट अजूनही प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 4, 2014 01:09 IST2014-08-04T01:09:03+5:302014-08-04T01:09:03+5:30

मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केल्यास त्यांची सद्य:स्थिती मोबाइलवर दिली जाणार असून ही सेवा लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून सुरू केली जाणार आहे

Mobile Ticket Still Waiting | मोबाइल तिकीट अजूनही प्रतीक्षेत

मोबाइल तिकीट अजूनही प्रतीक्षेत

मुंबई : मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केल्यास त्यांची सद्य:स्थिती मोबाइलवर दिली जाणार असून ही सेवा लवकरच रेल्वे मंत्रालयाकडून सुरू केली जाणार आहे. असे असतानाच अद्याप मात्र लोकलचे उपनगरीय तिकीट मोबाइलवर उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही. दोन वर्षे उलटून गेली तरी त्यावर विचारच सुरू असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण केल्यावर त्यांची सद्य:स्थिती आपल्याला रेल्वेच्या वेबसाइटवर मिळत जाते. यासाठी संगणक सुरू करा, त्यानंतर रेल्वेच्या (आयआरसीटीसी) वेबसाइटवर जाऊन ते पाहण्यात बराच वेळ जातो. हे पाहता त्याला पर्याय म्हणून एसएमएस अ‍ॅलर्ट अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. संबंधित प्रवाशाने आरक्षण फॉर्मवर असलेल्या मोबाइल नंबरच्या कॉलममध्ये आपला मोबाइल नंबर दिल्यास ही सेवा त्या प्रवाशाला मिळेल. प्रवाशाचे तिकीट ज्या तारखेचे असेल, त्याच्या पाच दिवस अगोदर असा प्रत्येक दिवशी एक एसएमएस प्रवाशाच्या मोबाइलवर रेल्वेकडून येईल. या एसएमएसमधून तिकीट आरक्षणाची सद्य:स्थिती दिली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र, ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला जात असतानाच ७५ लाख प्रवासी असलेल्या मुंबईतील उपनगरीय लोकल प्रवाशांचे अशाच प्रकारच्या तिकीट सुविधेकडे लक्ष लागलेले आहे. उपनगरीय लोकलचे तिकीट मोबाइलद्वारे बुक करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार होती. मात्र, दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लोटूनही ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या आयआरसीटीसीमार्फत अशी पास सेवा असली तरी त्यामध्ये अधिक शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले. लोकलचे तिकीट मोबाइलवर बुक केल्यास प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका होऊ शकते. मात्र, ही सेवा देताना अनेक तांत्रिक अडचणी असून त्यामुळे आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Mobile Ticket Still Waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.