लॉकडाऊन कालावधीत बड्या देवस्थानांचे उत्पन्न घटले, पालघर जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:12 AM2020-07-16T00:12:16+5:302020-07-16T00:13:15+5:30

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून शासनाने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद केली आहे . यात्रा, उत्सव, बोहाडे यावरही बंदी असल्याने हे उत्सव झाले नाहीत.

The income of big temples decreased during the lockdown period, the situation in Palghar district | लॉकडाऊन कालावधीत बड्या देवस्थानांचे उत्पन्न घटले, पालघर जिल्ह्यातील स्थिती

लॉकडाऊन कालावधीत बड्या देवस्थानांचे उत्पन्न घटले, पालघर जिल्ह्यातील स्थिती

Next

- शशिकांत ठाकूर

कासा : कोरोना संकटात खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील मंदिरे दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांची देणगी, दान थांबल्याने मंदिरांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मंदिरांवर अवलंबून असलेल्या दुकानदार व व्यावसायिकांवर बेकारीची स्थिती निर्माण झाली आहे.
लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून शासनाने मंदिरातील दर्शन व्यवस्था बंद केली आहे . यात्रा, उत्सव, बोहाडे यावरही बंदी असल्याने हे उत्सव झाले नाहीत. पालघर जिल्ह्यात डहाणूची महालक्ष्मी, विरारची जीवदानी माता येथे विविध उत्सव साजरे केले जातात. डहाणूच्या महालक्ष्मी देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेपासून दरवर्षी १५ दिवस भरते. तसेच जीवदानी देवी मंदिरात व महालक्ष्मी मंदिरात नवरात्र उत्सव काळात मोठी गर्दी असते. जूचंद्र येथील चंडिकादेवीची यात्रा, केळव्याची शीतलादेवी यात्रा, सातपाटीची व अर्नाळ्याची रामनवमी यात्रा, जव्हारचा शेकडो वर्षांची परंपरा असलेला तीन दिवस भरणारा जगदंब (बोहाडा) हे मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत होणारे उत्सव रद्द झाले. त्यामुळेही मंदिराच्या उत्पनात मोठी घट झाली असून अनेकांचा रोजगार बुडाला आहे.
डहाणू तालुक्यात महालक्ष्मी देवीची भरणारी जिल्ह्यातील ही सर्वात मोठी यात्रा १५ दिवस चालते. यात्रा कालावधीत पालघरबरोबर मुंबई, ठाणे, नाशिक जिल्ह्यांतील भाविकांबरोबरच गुजरात, सिल्वासा, दिव-दमण येथून दरदिवशी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. मात्र, या वर्षी कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर येथील १५ दिवसांची भरणारी यात्रा रद्द झाली. जीवनावश्यक वस्तूंबरोबरच करमणुकीचे खेळ व खाद्यपदार्थ यामुळे खरेदीसाठी येथे मोठी गर्दी असते. रोज लाखोंची उलाढाल होते. देणगी आणि दान स्वरूपात निधी जमा होतो. दुकानदार आणि तरूणांना यात्रेतून मोठा रोजगार मिळतो. मात्र, यावर्षी यात्रा रद्द झाल्याने हे सर्व उत्पन्न बुडाले आहे. जव्हार व विक्रमगड तालुक्यातील जगदंबा उत्सव व बोहाडे लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आले. जव्हारमध्ये १४ गावांत हे उत्सव होतात. जिल्ह्यातील मोठी देवस्थाने असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात व विरारच्या जीवदानी मंदिरात वर्षभर दर्शनासाठी मोठी गर्दी असते. यंदा दर्शन बंद असल्यामुळे मंदिर परिसरातील रोजगार बुडाला आहे.
आॅनलाइन देणगीदारांचे प्रमाण खूप कमी असल्याने जिल्ह्यातील मंदिरातील उत्पन्न चार ते पाच टक्क्यांवर आले आहे. मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरीही आंतरिक पाठ पूजा सुरू आहेत. दरम्यान, उत्पन्न घटल्याने इतर सोयीसुविधा बरोबरच मंदिरातील सेक्युरिटी, कर्मचारी, सफाई कामगार यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन मंदिर बंद असल्याने फुल हार व प्रसाद दुकाने चालविणार्यावर मोठी आर्थिक नामुष्की ओढवली आहे. लॉकडाऊन कालावधीत मंदिर ट्रस्टकडून मदतही करण्यात आली.

लॉकडाऊनमुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. भविष्यात कर्मचारी पगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच फुलहार दुकानदारांची मोठी आर्थिककोंडी झाली आहे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, विवळवेढे

मंदिर बंद आहे. त्यामुळे दानपेटी व देणगी उत्पन्न बंद झाले आहे. लोकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आॅनलाइन देणगीचे प्रमाणही क ाही प्रमाणात कमी झाले आहे. यामुळे हे उत्पन्न पाच टक्क्यांवर आले आहे.
- प्रदीप तेंडुलकर, सचिव, श्री जीवदानीदेवी संस्थान, विरार

Web Title: The income of big temples decreased during the lockdown period, the situation in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर