वसईत धावत्या एक्स्प्रेसखाली पत्नीला ढकलणाऱ्या पतीला अखेर बेड्या, भिवंडीतून अटक; नेमकं काय घडलं होतं पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 13:31 IST2022-08-24T13:24:10+5:302022-08-24T13:31:45+5:30
वसई रोड रेल्वे स्थानकात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धावत्या अवध एक्स्प्रेसखाली ढकलून पतीने तिची हत्या केली होती.

वसईत धावत्या एक्स्प्रेसखाली पत्नीला ढकलणाऱ्या पतीला अखेर बेड्या, भिवंडीतून अटक; नेमकं काय घडलं होतं पाहा...
मुंबई :
वसई रोड रेल्वे स्थानकात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला धावत्या अवध एक्स्प्रेसखाली ढकलून पतीने तिची हत्या केली होती. या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने तत्काळ कारवाई करत पती मेहंदी अन्सारी (३७) याला १२ तासांत भिवंडीतून अटक केली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकावरील फलाट क्रमांक पाचवर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक जोडपे त्याच्या दोन लहान मुलांसह झोपले होते. मात्र, पतीच्या मनात पत्नीविषयी घृणा निर्माण झाली होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन रागाच्या भरात पतीने पत्नीस मुंबईकडे येणाऱ्या अवध एक्स्प्रेसखाली ढकलून दिले. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्याचे गांभीर्य जाणून लोहमार्ग पश्चिम परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पथके तयार केली. यासाठी सीसीटीव्हीची तपासणी करण्यास सुरुवात केली. मृताच्या अंगावरील कपडे, दागिने, चेहरापट्टी याची पाहणी करून मृत व्यक्ती कुठला असेल याचा शोध घेतला जात होता. यावेळी उत्तर भारतातील जोडपे असल्याचे समजून आले. हे जोडपे कुठून आल्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता.
VIDEO: वसईत धावत्या एक्स्प्रेससमोर पत्नीला ढकलून फरार झालेल्या पतीला अखेर अटक करण्यात आली आहे, सीसीटीव्हीत कैद झाली होती घटना pic.twitter.com/Mjjtmz7RGE
— Lokmat (@lokmat) August 24, 2022
पतीपत्नीत वारंवार उडायचे खटके
यावेळी पोलिसांना आरोपी हा भिवंडीत राहत असून रंगकाम करतो, अशी माहिती मिळाली. आरोपीला पकडण्यासाठी त्याच्या घराजवळ सापळा रचून पकडले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीपत्नीत वारंवार वाद होत होता. या वादातूनच आरोपीने पत्नीची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसल्याचे प्राथमिक चौकशीत समजले आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी दिली.