मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ; एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात तर दुसऱ्यातील तिसऱ्या प्रभागात नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 21:58 IST2025-11-21T21:58:03+5:302025-11-21T21:58:27+5:30
मीरा भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने २४ प्रभागातील प्रारूप मतदार याद्या हरकती - सुचने साठी जाहीर केलेल्या. सदर याद्या घेण्यासाठी पालिकेत इच्छुकांनी गुरुवार पासून गर्दी केली आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ; एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात तर दुसऱ्यातील तिसऱ्या प्रभागात नावे
- धीरज परब
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड- मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यां मध्ये प्रचंड घोळ असल्याचे समोर आले आहे. एका एका प्रभागातील २० ते ३० टक्के नावे काढून दुसऱ्या वा तिसऱ्या प्रभागात दाखवण्यात आली आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे.
मीरा भाईंदर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने २४ प्रभागातील प्रारूप मतदार याद्या हरकती - सुचने साठी जाहीर केलेल्या. सदर याद्या घेण्यासाठी पालिकेत इच्छुकांनी गुरुवार पासून गर्दी केली आहे. शिवाय महापालिकेच्या संकेत स्थळावर देखील प्रारूप मतदार याद्या उपलब्ध आहेत. मात्र पालिकेने जाहीर केलेल्या ह्या प्रारूप याद्या पाहुन अनेक इच्छूकांचे धाबे दणाणले आहेत. शुक्रवारी पहिल्याच दिवशी ३ हरकती याद्यां बाबत पालिके कडे आल्या आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत सह माजी नगरसेवक राजीव मेहरा, जुबेर इनामदार आदींनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांची भेट घेऊन तक्रार केली. यावेळी प्रभागातील अनेक गृहसंकुलांची नांवे आजूबाजूच्या प्रभागां मध्ये टाकण्यात आली असून सुमारे ३० टक्के मतदार एका प्रभागातून दुसऱ्या वा तिसऱ्या प्रभागात टाकण्यात आले आहेत. आधीच हरकती सूचना साठी २७ तारीख असून मतदार याद्यां मधील घोळ पाहता आधी सुधारित याद्या प्रसिद्ध करा आणि नंतर हरकत सूचना साठी मुदत द्या अशी मागणी काँग्रेस शिष्ट मंडळाने आयुक्तांना केली.
त्यावर आम्ही मतदार याद्यां मध्ये सुधारणा करून देऊ असे आश्वासन आयुक्तांनी दिली असले तरी आम्ही राज्य निवडणूक आयोगा कडे देखील तक्रार केल्याचे प्रमोद सामंत म्हणाले. भाजपा आणि निवडणूक आयोग सह महापालिका स्थरावरील वोटाचोरीचा हा आणखी एक उत्तम पुरावा असल्याचा आरोप जुबेर इनामदार यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक नीलम ढवण यांनी देखील प्रारूप मतदार याद्या आता पर्यंतच्या गडबड घोटाळ्याचा कहर असल्याचे सांगितले. आपल्या प्रभाग ३ मधील इमारतींना प्रभाग ४ मध्ये व प्रभाग ११ मध्ये टाकले असून अन्य प्रभागातील निवासी इमारती - परिसर आपल्या प्रभागात टाकण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
प्रभाग १० मध्ये देखील चक्क प्रभाग ४ आणि प्रभाग ११ मधील असंख्य इमारती यादीत आलेल्या आहेत. तर प्रभाग ४ आणि प्रभाग ११ मधील निवासी संकुले प्रभाग १० मध्ये दाखवली आहेत. प्रभाग ४ मधील परिसर हा प्रभाग १०, प्रभाग ११ आणि प्रभाग ३ मध्ये टाकण्यात आला आहे. भाईंदर पश्चिमेस प्रभाग ८ मध्ये देखील असाच घोळ केलेला आहे.
मीरारोडच्या प्रभाग २१ मधील सृष्टी सेक्टर ३, कल्पतरू, नवयुवान हा परिसर प्रभाग १७ मध्ये टाकला आहे. तर प्रभाग १६ मधील शांतिगार्डन, शांतीधाम, पेणकरपाडा परिसर हा प्रभाग २१ मध्ये दाखवला आहे. प्रभाग ९, २२, १९ आदी मध्ये देखील असाच अदलाबदलीचा खेळ केला गेला आहे. अनेक प्रभागातील सुमारे २० ते ३० टक्के मतदारांचे अन्य प्रभागात स्थलांतर केले गेले आहे.
मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी आरोप केला कि, विधानसभा निवडणुकां मध्ये घोटाळे करून सत्ता बळकावल्या नंतर आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील मतदार याद्यांत घोटाळे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मतदार याद्यांतील बोगस मतदारांची नावे अजून वगळलेली नाहीत. त्यात पालिकेने सत्ताधारी भाजपच्या फायद्यासाठी बोगस मतदारांच्या वरून लक्ष हटवण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रकार केल्याचे राणे म्हणाले.
विधानसभा निवडणुकी वेळच्या मतदार याद्या ह्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय विभागणीचे काम महापालिकेच्या कर विभागाने केले आहे. कर विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशीची मागणी केली जात आहे.