भयंकर! किरकोळ वाद, नालासोपाऱ्यात मनोरुग्ण भावाने बहिणीचा केला शिरच्छेद, कोयत्याने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:39 IST2026-02-24T15:38:27+5:302026-02-24T15:39:10+5:30
Nalasopara Crime News: वसई विरार परिसरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मालिकेने मंगळवारी पहाटे आणखी एक थरकाप उडवणारी भर पडली. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा येथील सर्वोदय वसाहतीत एका मनोरुग्ण भावाने सख्ख्या बहिणीचा कोयत्याने वार करून शिरच्छेद केल्याची भीषण आणि धक्कादायक घटना उघडकीस आली. म

भयंकर! किरकोळ वाद, नालासोपाऱ्यात मनोरुग्ण भावाने बहिणीचा केला शिरच्छेद, कोयत्याने केले सपासप वार
- मंगेश कराळे
नालासोपारा - वसई विरार परिसरात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मालिकेने मंगळवारी पहाटे आणखी एक थरकाप उडवणारी भर पडली. नालासोपारा पूर्वेकडील टाकीपाडा येथील सर्वोदय वसाहतीत एका मनोरुग्ण भावाने सख्ख्या बहिणीचा कोयत्याने वार करून शिरच्छेद केल्याची भीषण आणि धक्कादायक घटना उघडकीस आली. मध्यस्थी करण्यासाठी धावून गेलेल्या आईवरही हल्ला करण्यात आला असून त्या गंभीर जखमी आहेत. गेल्या आठवड्यातील ही तिसरी हत्या ठरल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साईधाम वेल्फेअर चाळीत राहणाऱ्या सुप्रिया कानडे (३५) या पहाटेच्या सुमारास घरी असताना त्यांचा भाऊ अजित मालुष्टे (४०) याच्यासोबत वाद झाला. शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच हिंसक स्वरूपात बदलला. संतापाच्या भरात आरोपीने कोयता उचलून बहिणीवर सपासप वार केले. मानेवर आणि छातीवर गंभीर घाव बसल्यानंतर त्याने सुप्रिया यांचा शिरच्छेद केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते.
आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करताच तिच्यावरही हल्ला करण्यात आला. त्या गंभीर जखमी असून मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळींज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. आरोपी मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती मिळत असली तरी त्याची वैद्यकीय पडताळणी आणि गुन्ह्याचा नेमका हेतू याबाबत तपास सुरू आहे.
वसई-विरारमध्ये सलग घडणाऱ्या हत्यांमुळे कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी वसईत एका अल्पवयीन मुलाने आपल्या आत्याची हत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर नालासोपाऱ्यात भररस्त्यात झालेल्या टोळी संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुन्हा उघडकीस आलेली ही निर्घृण हत्या नागरिकांच्या असुरक्षिततेच्या भावनेला अधिक तीव्र करणारी ठरली आहे.
पोलीस गस्त आणि गुन्हे प्रतिबंधक उपाययोजनांचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात रक्तरंजित घटनांची मालिका थांबताना दिसत नाही. कौटुंबिक वाद, टोळी संघर्ष आणि अनियंत्रित संताप यांच्या छायेत सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन असुरक्षित बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून परिसरात कायद्याचा धाक निर्माण करणे आणि नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करणे ही आता काळाची गरज बनली आहे.