तारापूरमध्ये धोकादायक स्थितीत अवजड वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:37 AM2021-03-10T00:37:05+5:302021-03-10T00:37:14+5:30

काही वाहतूकदारांचे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष : मोटार वाहन कायदे बसवले जातात धाब्यावर

Heavy traffic in dangerous conditions in Tarapur | तारापूरमध्ये धोकादायक स्थितीत अवजड वाहतूक

तारापूरमध्ये धोकादायक स्थितीत अवजड वाहतूक

Next

पंकज राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील स्टील कारखान्यांमध्ये प्रतिदिन हजारो टन लोखंड व स्टील क्वाईलसह विविध प्रकारच्या प्रचंड अवजड मालाची वाहतूक करताना  काही वाहतूकदार सुरक्षिततेकडे गंभीरपणे लक्ष न देता वाहतुकीचे व मोटार वाहन कायदे पायदळी तुडवीत असल्याने जीवघेण्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याकडे पालघर (वसई) विभागाचे उपप्रादेशिक परिवहन  कार्यालय व बोईसरचे वाहतूक पोलीस फारसे गंभीरपणे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

तारापूर एमआयडीसीतील अनेक स्टील कारखान्यांबरोबरच बोईसर पूर्वेकडील  बोईसर-चिल्हार फाटा रस्त्यावरील मान व वारांगडेसह एमआयडीसीमध्ये विराज स्टील या उद्योग समूहाचे  विविध प्रकारचे स्टील उत्पादन करणारे अनेक कारखाने असून तेथे मोठ्या प्रमाणात लोखंडी भंगार बाहेरून आणून ते भट्टीत वितळवून त्यापासून लोखंडी ब्लेड  तयार केले जातात. नंतर त्यापासून वायर व इतर अनेक उत्पादने तयार केली जातात. एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात  तसेच बाहेरून लोखंडी अवजड मालाची अहोरात्र ने-आण करताना  सुरक्षिततेच्या दृष्टीने  साइड सपोर्टबरोबरच अवजड माल लोखंडी साखळीने बांधणे गरजेचे आहे, परंतु ते अवजड लोखंडाचे ब्लेड मोकळेच एकावर एक ठेवून  वाहतूक होत असल्याने ते वळणावर  घसरून  खाली  पडल्यास  पादचारी किंवा वाहनचालकांना धोका उद्भवू शकतो. अनेक  ट्रेलरमध्ये  प्रचंड   ओव्हरलोड लोखंड असते. मात्र सुरक्षिततेचे सर्व कायदे धाब्यावर बसवून जी अवजड मालवाहतूक केली जाते, त्यामुळे काही वेळा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याच्या  दाट शक्यतेबरोबरच रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहतूक होत असल्याने रस्त्यावर खड्डे पडून रस्त्यांचीही दुर्दशा होत आहे. 

तारापूर एमआयडीसीमध्ये पासिंग क्षमतेपेक्षा जास्त अवजड माल धोकादायक पद्धतीने व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक करणाऱ्या तसेच  ओव्हर साईज वाहनांची विशेष तपासणी मोहीम लवकरच राबविण्यात येऊन मोटार वाहन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
- दशरथ वाघुळे, 
उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी, पालघर (वसई) विभाग

सार्वजनिक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त धोकादायक अवजड मालवाहतुकीवर  कारवाई नेहमी सुरूच असते व ती पुढेही सुरूच राहील.
- प्रदीप कसबे, 
पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे 

Web Title: Heavy traffic in dangerous conditions in Tarapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.