महाआरोग्य शिबिरामुळे भाजपाची ‘तब्येत बिघडणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 23:32 IST2019-02-23T23:31:54+5:302019-02-23T23:32:09+5:30
काँग्रेसकडून आचारसंहिता भंगाची तक्रार : आरोग्य तपासणीच्या निमित्ताने मतांच्या बेगमीचा प्रयत्न केल्याचा आरोप

महाआरोग्य शिबिरामुळे भाजपाची ‘तब्येत बिघडणार’
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला ‘महा आरोग्य शिबीर’ कार्यक्र म स्थानिक भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या सुमारे ९५ लाखाच्या निधीतून होणाऱ्या या कार्यक्र माच्या जाहिराती, बोर्ड वर भाजप चे चिन्ह कमळ आणि पदाधिकाºयांचे फोटो झळकवित जसं काही आपल्या फंडातूनच या शिबिराद्वारे रु ग्णांचे उपचार केले जाणार आहेत असे भासवून येणाºया निवडणुकीत मतांची गणिते आखण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवंगत खासदार अॅड. चिंतामण वणगा यांच्या स्मृती प्रित्यर्थ विनामूल्य असे ‘भव्य अटल आरोग्य शिबिराचे’ आयोजन ३ मार्च रोजी पालघर प्रस्तावित जिल्हा प्रशासकीय इमारत येथे आयोजित करण्यात आले आहे. पालघर जिल्हा प्रशासनाने या कार्यक्र माचे आयोजन केले असून आदिवासी विकास विभागा कडून ९५ लाखाचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातील घराघरात आरोग्य तपासणीसाठी मुंबई, पुणे, येथून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ञ डॉक्टर्स बोलाविण्यात आले आहेत. परंतु ह्या डॉक्टरांच्या सोबत भाजप चे त्या त्या भागातील कार्यकर्त्यांची फळी मतदारा पर्यंत पोहणार आहे.
शासनाची योजना ग्रामीण भागातील गाव-पाड्या पर्यंतच्या लोकांपर्यंत पोचावी, दुर्धर रु ग्णाना डॉक्टरां कडून विनामूल्य उपचार व्हावेत हा या मागचा उद्देश असताना आणि शासनाचा म्हणजेच जनतेने जमा केलेल्या टॅक्स रु पी पैशातून या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले असताना जिल्ह्यातील भाजप च्या काही पदाधिकाºयांनी आपले फोटो व कमळ हे चिन्ह या आरोग्य शिबिराच्या बॅनर वर चिटकवून तसे हँडबील ही जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहेत. जणू काही हा कार्यक्र म भाजप पक्षाच्या फंडातून आयोजित करण्यात आल्याचे दाखवीण्याचा प्रयत्न मतदाराकडे करण्यात आला आहे. पालघर नगरपरिषदेच्या निवडणूकीची आचारसंहिता २१ फेब्रुवारी पासून लागू झाली आहे. त्यामुळे या शिबिराची हॅन्डबिले व बॅनर लावून मतदारांना प्रभावित केले असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे आचार सहिता भंगाची तक्रार केली आहे.