"अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:12 IST2025-07-25T16:12:31+5:302025-07-25T16:12:48+5:30

नायगावमध्ये खिडकीला सुरक्षा जाळी नसल्यामुळे एका चार वर्षाच्या चिमुकलीचा १२ व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला.

Four year old girl dies after falling from 12th floor of building in Naigaon video viral | "अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्...

"अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्...

Vasai Girl Accident: वसईच्या नायगावमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीचा १२ व्या मजल्यावरुन पडून दुर्दैवी मृत्यू झाला. नायगाव पूर्वेच्या भागात नवकार इमारतीमध्ये नातेवाईकांना भेटून निघालेली अन्विका आणि तिची चप्पल घेण्यासाठी दरवाजाबाहेर उभी राहिली होती. अन्विकाच्या आईने तिला चपलांच्या स्टँडवर बसवलं होतं. आई दुसरीकडे वळताच अन्विका खिडकीवर बसायला गेली. मात्र तिचा तोल गेला आणि थेट १२ व्या मजल्यावरुन खाली कोसळली. कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नायगावच्या नवकार इमारतीमध्ये मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास बाराव्या मजल्या वरून खाली पडून चार वर्षीय अन्विकाचा मृत्यू झाला. अन्विका तिच्या आईसोबत नवकार इमारतीमध्ये बाराव्या मजल्यावर राहणाऱ्या प्रजापती कुटुंबियांकडे आल्या होती. कुटुंबियांची भेट घेऊन अन्विका तिच्या आईसोबत घरी निघाली होती. चप्पल घालत असल्याने अन्विकाच्या आईने तिला चप्पल ठेवण्याच्या स्टँडवर बसवले आणि ती मागे वळून चप्पल घालू लागली. मात्र स्टँडला लागूनच खिडकी असल्याने अन्विका त्याच्यावर बसायला गेली. मात्र खिडकी उघडी असल्याने अन्विका थेट १२ व्या मजल्यावरुन खाली कोसळली. अन्विकाच्या आईसमोर हा सगळा प्रकार घडला. त्यामुळे ती जोरजोरात ओरडू लागली. तिला काय करावं हे सुचेना. काही वेळाने तिसुद्धा खाली धावत गेली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

रहिवाशांनी अन्विकाला तात्काळ वसईच्या सर डी एम पेटिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारापू्र्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अन्विकाच्या मृत्यूने तिच्या आईला जबरदस्त धक्का बसला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून त्यामध्ये चिमुकली अन्विका खाली कोसळता आणि तिची आई आक्रोश करताना दिसत आहेत.

दरम्यान,  नवकार सोसायटीमधील बऱ्याच इमारतींच्या खिडक्यांना कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा जाळ्या बसवलेल्या नाहीत. तसेच अन्य ठिकाणी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे रहिवाशांनी म्हटलं. अन्विका जिथून पडली त्या खिडकीलाही कोणतीही सुरक्षा जाळी नसल्याने ती थेट खाली कोसळली होती. गंभीर दुखापत झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
 

Web Title: Four year old girl dies after falling from 12th floor of building in Naigaon video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.