मुले चोरीच्या संशयावरून चार महिलांना बेदम मारहाण; विरारच्या सहकारनगर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 07:17 IST2026-01-24T07:16:35+5:302026-01-24T07:17:05+5:30
पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला

मुले चोरीच्या संशयावरून चार महिलांना बेदम मारहाण; विरारच्या सहकारनगर येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: विरारच्या सहकारनगर परिसरात मुले चोरीच्या संशयातून गुरुवारी सकाळी चार महिलांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांना घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत केले. जखमी महिलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विरारच्या सहकारनगर ऑटो स्टँडजवळ रहिवाशांनी चार महिला संशयास्पदरीत्या फिरताना पाहिले. मुले चोरणाऱ्या असल्याचे समजून त्या महिलांना घेरले. त्यानंतर टोळीची अफवा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मोठा जमाव जमल्यानंतर त्यांनी प्रश्न न विचारताच महिलांवर हल्ला केला. पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चार महिलांना जमावापासून वाचवले.
वसईतही घडली होती घटना
गेल्या काही दिवसांपासून वसईत समाजमाध्यमांवर लहान मुले पळवणारी टोळी आल्याचे संशयित आरोपींचे फोटो व्हायरल होत होते. तेव्हापासून स्थानिक नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. अशीच एक घटना गेल्यावर्षी जुलैमध्ये वसईतील मुळगाव येथे घडली होती. दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करणाऱ्या रिक्षाचालकासह तीन नकली तृतीयपंथींना स्थानिकांनी चोप दिला होता.
नागरिकांचे जबाब नोंदविले
नागरिकांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती विरार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांनी दिली.
‘त्या’ मध गोळा करण्यासाठी आल्या...
- अफवा कशी पसरली हे शोधण्यासाठी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. पीडित महिला यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
- नायगाव पूर्व जुचंद्र स्टेशनच्या झोपडपट्टी भागात राहतात. त्या सर्व वसई-विरार शहरातील झाडांवरील मध गोळा करण्यासाठी आल्या असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांनी दिली.
- मुलांच्या अपहरणाशी मध गोळा करणाऱ्या महिलांचा संबंध नाही. अफवेमुळे त्यांना लक्ष्य केले आहे. पोलिसांनी जनतेला कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन केले आहे.