ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 06:06 IST2025-10-15T06:06:19+5:302025-10-15T06:06:27+5:30
अनधिकृत इमारतींना अभय देऊन पवार यांनी कमावले १६९ कोटी : ईडी

ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वसई - विरार परिसरात मलनि:स्सारण आणि डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर भूखंडावर बांधलेल्या ४१ अनधिकृत इमारतींच्या भ्रष्टाचारप्रकरणी वसई - विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार आणि विकासक सीताराम गुप्ता यांची एकूण ७१ कोटी रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी जप्त केली आहे. मात्र, या मालमत्तेचा तपशील ‘ईडी’ने जाहीर केला नाही.
पवार यांनी या घोटाळ्याच्या माध्यमातून १६९ कोटी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याचा ठपका ‘ईडी’ने त्यांच्यावर ठेवला आहे. या पैशांतून त्यांनी गाेदामे, फार्म हाउस, गृहनिर्माण प्रकल्पांत पत्नीच्या तसेच मुलीच्या नावे फ्लॅट सोने, हिरे, महागड्या साड्या, आदींमध्ये गुंतवणूक केली आहे. यापूर्वी ‘ईडी’ने केलेल्या कारवाईदरम्यान पवार यांची ४४ कोटी रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने गोठवली आहे.
प्रतिचौरस फूट २० ते २५ रुपये दराने स्वीकारली लाच
वसई - विरार परिसरात झालेल्या बांधकामप्रकरणी पवार यांनी प्रतिचौरस फूट २० ते २५ रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ‘ईडी’च्या प्राथमिक तपासात आढळले आहे. तर, तत्कालिन नगररचनाकार वाय. एस. रेड्डी यांनी प्रतिचौरस फूट १० रुपये दराने ४१ इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ‘ईडी’ने ठेवला आहे.
याखेरीज या प्रकरणामध्ये कनिष्ठ अभियंते, वास्तुविशारद, सनदी लेखापाल आणि अनेक एजंट यांचाही समावेश आहे. याप्रकरणी मीरा - भाईंदर पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, मनी लाँड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ‘ईडी’ने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
२९ जुलैला १२ ठिकाणी छापे
२९ जुलै रोजी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी १ कोटी ३३ लाख रुपयांची रोख रक्कम आढळली होती. पवार यांच्या नातेवाइकांच्या नावे तसेच बेनामी मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली. पवार सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.