महापालिका क्रीडा संकुलात बुडून मृत्यू झालेल्या ११ वर्षीय चिमुरड्याच्या वडिलांनी ५ लाखांची मदत नाकारली; केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 16:17 IST2025-08-27T16:16:28+5:302025-08-27T16:17:09+5:30

मुलाला न्याय मिळावा आणि पुन्हा कोणा ग्रंथचा भ्रष्ट व्यवस्थे मुळे बळी जाऊ नये यासाठी आपला लढा; राजकीय पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलीस व पालिकेवर दबाव असल्याचा वडिलांचा आरोप 

Father of 11-year-old boy who drowned in municipal sports complex refuses Rs 5 lakh assistance; makes serious allegations | महापालिका क्रीडा संकुलात बुडून मृत्यू झालेल्या ११ वर्षीय चिमुरड्याच्या वडिलांनी ५ लाखांची मदत नाकारली; केला गंभीर आरोप

महापालिका क्रीडा संकुलात बुडून मृत्यू झालेल्या ११ वर्षीय चिमुरड्याच्या वडिलांनी ५ लाखांची मदत नाकारली; केला गंभीर आरोप


मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून मृत्यू झालेल्या ११ वर्षीय ग्रंथ मुथा ह्याच्या वडिलांना पालिकेने देऊ केलेली ५ लाखांची मदत त्यांनी नाकारली आहे. मला पैसे नकोत तर ग्रंथला न्याय देण्यासाठी आणि भ्रष्ट आणि भीती - लाज नसलेल्या व्यवस्थेमुळे पुन्हा कोणाच्या काळजाच्या तुकड्याचा बळी जाऊ नये यासाठी आपला लढा असल्याचे त्याचे वडील हसमुख मुथा म्हणाले. पोलीस व पालिकेवर आमदाराचा दबाव असल्याने ह्यात गुंतलेल्या भाजपा पदाधिकारी, पालिका अधिकारी यांना आरोपी केले नाही व कारवाई केली नाही असा आरोप मुथा यांनी पत्रकार परिषदेत केला.  आपल्या व कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचे ते म्हणाले. 

भाईंदर पूर्वेच्या स्व. गोपीनाथ मुंडे पालिका क्रीडा संकुलात पोहण्यासाठी जाणाऱ्या ग्रंथचा २० एप्रिल रोजी बुडून मृत्यू झाला होता. त्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होऊन नवघर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मुथा यांच्या फिर्यादी नंतर नवघर पोलिसांनी ठेकेदार, व्यवस्थापक व चौघे प्रशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल केला.  

मंगळवारी हसमुख मुथा यांनी मनसेचे सचिन पोपळे, अभिनंदन चव्हाण तर काँग्रेसचे दीपक बागरी, नातलग व मित्रपरिवार सह मंगळवारी भाईंदर मद्ये पत्रकार परिषद घेतली. अनेक गौप्यस्फोट व आरोप केले गेले. तरण तलाव येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये घटनास्थळी जीवरक्षक नव्हते, पुरेसे फ्लोटर पुरवले नव्हते. ग्रंथ ह्याने स्वतःला वाचवण्याचा ११ वेळा प्रयत्न करून देखील त्याला मदत  मिळाली नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. नव्हे हि हत्या आहे. सुरक्षेसाठीचे मापदंड पाळले गेले नाहीत. प्रशिक्षक यांना योग्य प्रशिक्षण नाही.  पोहण्याच्या  कॅम्प साठी पालिकेची परवानगी घेतली नाही.

ग्रंथच्या ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्याचा सर्वच धर्म - जातीच्या नागरिकांनी विरोध केला. प्रत्येकाला हि घटना स्वतःच्या कुटुंबातील एका मुला सोबत झाली असे वाटले. लोकांच्या आधारा मुळेच माझ्या सारखा सामान्य माणूस आज ह्या भ्रष्ट व्यवस्थे विरुद्ध आणि पुन्हा कोणाच्या घरातील मूल असे बळी जाऊ नये यासाठी लढण्याची हिम्मत करू शकला असे मुथा म्हणाले. सुरवाती असून मनसेच्या पाठिंबा मुळे मला हिम्मत आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, काँग्रेस, शिवसेना आदी विविध पक्ष, संस्था आदींनी ग्रंथला न्याय मिळावा व शहरात पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. 

पालिकेने ठेका साहस चॅरिटेबल ट्रस्टला दिला असताना सर्व व्यवहार नीरज शर्मा व प्रणित अग्रवाल यांच्या साहस हॉस्पिटॅलिटी व साहस स्पोर्ट्स कंपनी करत होती. योगेश सिंग व नम्रता सिंग नावाच्या खात्यात नियमित पैसे गेले आहेत. भाजपा पदाधिकारी करनीचरन सिंग ह्याला दर महिना १ लाख रुपये ठेकेदार कडून दिले जायचे. पोलिसांनी केवळ ५ महिन्यांचेच बँक स्टेटमेंट घेतले.  भाजपचे दुसरे पदाधिकारी मधुसूदन पुरोहित यांचा यात समावेश असून पोलीस जबाबात त्यांनी आपण आपल्या प्रभागातील लोकांच्या प्रवेश साठी संकुलात जायचो असे म्हटले आहे. हे दोघेही आमदार  नरेंद्र मेहतांच्या गटातील असून त्यांच्या दबाव मुळे पोलिसांनी ह्या सर्वांची काटेकोर सखोल चौकशी केली नाही व त्यांना आरोपी केले नाही.  

ठेकेदाराने परस्पर उपठेकेदार आणि नियमबाह्य कामे व आर्थिक व्यवहार चालवला असताना पालिकेच्या अधिकारी दीपाली पवार यांनी सतत दुर्लक्ष केले. पालिकेच्या ठरलेल्या शुल्कची अंलबजावणीच केली जात नव्हती. कँटीनच्या नावाने हॉटेल चालवले जे भाड्याने दिले होते. ठेकेदाराने १ कोटी ४४ लाख रुपये लोकांचे घेतले ते अजून परत केले नाहीत. क्रीडा संकुलातील नोंदवहीत अधिकारी यांच्या पाहणीची नोंद नाही. पालिका उपायुक्त कल्पिता पिंपळे आणि पवार यांचे पोलिसातील जबाब हे कॉपी पेस्ट आहेत. केवळ नाव, पद हेच बदलले आहे. पोलिसांनी पालिका अधिकारी यांना आरोपी केले नाही. तर पालिका आयुक्तांनी देखील कोणाला निलंबित केले नाही व ह्या गैरप्रकार बाबत गुन्हा दाखल केला नाही. राजकीय दबाव मुळे ग्रंथचे मारेकरी मोकळे आहेत. पोलीस आणि पालिकेची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात न्याय मागण्याचा विचार सुरु आहे असे मुथा यांनी सांगितले.

Web Title: Father of 11-year-old boy who drowned in municipal sports complex refuses Rs 5 lakh assistance; makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.