रेल्वेच्या कंत्राटावरून वाद, तीन भावंडांवर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:19 IST2025-08-07T12:19:06+5:302025-08-07T12:19:41+5:30

रेल्वेचे कंत्राट घेण्याच्या वादातून हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. शर्मा याला न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली...

Dispute over railway contract, three siblings attacked | रेल्वेच्या कंत्राटावरून वाद, तीन भावंडांवर प्राणघातक हल्ला

रेल्वेच्या कंत्राटावरून वाद, तीन भावंडांवर प्राणघातक हल्ला

मीरा रोड : रेल्वेची कामे करणाऱ्या तीन मराठी भावंडांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिसांनी आठ जणांवर बुधवारी गुन्हा दाखल केला असून, राहुल शर्मा याला अटक केली आहे, अन्य आरोपी फरार आहेत. रेल्वेचे कंत्राट घेण्याच्या वादातून हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.  शर्मा याला न्यायालयाने ११ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

भाईंदरच्या राई गावातील रूपेश पाटील, भूषण पाटील, नितेश पाटील हे तिघे रेल्वे आणि अन्य सरकारी कामे कंत्राटाने घेतात. मंगळवारी सायंकाळी हे तिघे भाऊ, रूपेश यांचा मुलगा यश, सहकारी संकेत म्हात्रे यांच्यासह रेल्वे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे रेल्वेचे कंत्राट घेणारा जयेश माजलकरसह महेश शेट्टी, राहुल शर्मा, त्यांचे साथीदार काळ्या स्कॉर्पिओमधून आले. यावेळी रूपेश यांनी रेल्वेने माझ्या कंपनीला बॉयकॉट केल्याचे लोकांना का खोटे सांगत आहेस, असे जयेश याला विचारले. या रागातून जयेश, शर्मा आणि अन्य साथीदारांनी मारहाण केली. महेश, शर्मा आणि साथीदारांनीही गाडीतून रॉड, चॉपर काढून रूपेश, भूषण, नितेश आदींवर प्राणघातक हल्ला चढविला. 

हल्ला करून खंडणीचा केला बनाव?
पाटील बंधुंवर हल्ला केल्यानंतर ते जखमी अवस्थेत असताना हल्लेखोरांनी व्हिडीओ काढून खंडणीबाबत विचारणा करत व्हिडीओ बनविला. नंतर राहुल शर्माने पोलिस ठाण्यात जाऊन पाटील बंधुंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले, तर आरोपी जयेश माजलकर यानेही व्हिडीओद्वारे मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगत संकेत म्हात्रे, रूपेश पाटील यांनी रेल्वेचे काम सोडून दे, अन्यथा २५ लाख दे, असे सांगून मारहाण केली. संरक्षणासाठी प्रतिकार केला. त्यात ते जखमी झाल्याचा दावा करत, पोलिसांनी आमची तक्रार घेतली नसल्याचे म्हटले आहे. 

ऑर्केस्ट्रा बार चालकाचा भाऊ अन् खून, मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपी
महेश शेट्टी हा ऑर्केस्ट्रा बार चालकाचा भाऊ आहे. महेश हा खून, मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. राहुल शर्मावरही गुन्हे दाखल आहेत. आणखी तिघा आरोपींची पोलिसांना ओळख पटली असून, अभिषेक मिश्रा, अविनाश मिश्रा आणि शैलेश राजपूत अशी त्यांची नावे असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Web Title: Dispute over railway contract, three siblings attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.