कायदे धाब्यावर बसवून घातक कचऱ्याची लावतात विल्हेवाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 11:44 PM2021-04-23T23:44:58+5:302021-04-23T23:45:05+5:30

विळखा प्रदूषणाचा : मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविणे आहे बंधनकारक

Disposal of hazardous waste by law | कायदे धाब्यावर बसवून घातक कचऱ्याची लावतात विल्हेवाट 

कायदे धाब्यावर बसवून घातक कचऱ्याची लावतात विल्हेवाट 

Next

पंकज राऊत 
 लोकमत न्यूज नेटवर्क 
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील बहुसंख्य उद्योगांमधून उत्पादन प्रक्रियेनंतर विविध प्रकारच्या  प्रचंड मोठ्या प्रमाणात घातक कचऱ्याची निर्मिती होत असते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार हा कचरा विल्हेवाटीसाठी  तळोजा  येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविणे बंधनकारक असतानाही तारापूरमध्ये कायदे धाब्यावर बसवून घातक कचऱ्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावली जात असल्याच्या  अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत.
तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये रासायनिक औषध, स्टील, बल्क ड्रग्ज  इत्यादी विविध प्रकारचे उत्पादन घेणारे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. या उद्योगांमधून निर्माण होणाऱ्या घातक घनकचऱ्यापैकी बहुसंख्य कचरा हा मानवी आरोग्याला आणि पर्यावरणालाही प्रचंड धोका पोहोचविणारा असल्याने सर्व घातक कचरा हा केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विल्हेवाट नियमानुसार काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. मात्र काही उद्योजक उत्पादन खर्च व विल्हेवाटीसाठी येणारा खर्च वाचविण्यासाठी वारंवार चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत असूनही त्यांच्यावर अंकुश ठेवण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण  मंडळाला अजूनही  फारसे यश न आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
 मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या  वाहनांमधूनच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक  कचरा विल्हेवाटीसाठी तळोजा येथे नेणे बंधनकारक आहे, परंतु काही उद्योगांमधून घातक कचरा औद्योगिक क्षेत्रातील किंवा परिसरातील गावांतील निर्जन किंवा सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी अनधिकृतपणे प्लास्टिक गोणींत भरून किंवा सुटा टाकला जातो, तर काही उद्योगांमध्येच  साठवणूक करून संधी मिळताच अशा पद्धतीने बेजबाबदारपणे विल्हेवाट लावून मानवी आरोग्याशी  अक्षरशः खेळ खेळला जात आहे.
मागील चार-पाच दशकांमध्ये अनधिकृतपणे घातक घनकचऱ्याच्या विल्हेवाटीच्या अनेक घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापूर १ व २ च्या विभागाचे अधिकारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर किंवा माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट देतात. त्या घातक घनकचऱ्याचा पंचनामा करून नमुना  प्रयोगशाळेत तपासणीकरिता  पाठवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुठल्या  उद्योगाचा कचरा असावा, यासंदर्भात  चौकशीचे कागदी घोडे नाचविले जातात. मात्र हे भयंकर कृत्य करणारे फारसे पारदर्शकपणे समोर न आल्याने ते मोकाटच राहत आहेत. कारवाई होत नसल्याने आणि कायद्याची भीती न राहिल्याने वारंवार कायदे धाब्यावर बसविले जात आहेत.
वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घातक कचऱ्याची वाहतूक घातक कचरा नियमानुसार व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाली पाहिजे, असे काही वर्षांपूर्वी सांगितले होते.
त्यामुळे अतिशय सक्षमपणे व  परिणामकारक पद्धतीने घातक कचऱ्यासारखा गंभीर प्रश्न हाताळणे गरजेचे आहे, परंतु दोषींविरुद्ध सक्त व कठोर कारवाईअभावी  प्रति वर्ष हजारो टन निर्मित होणाऱ्या घातक कचऱ्यापैकी काही कचऱ्याची अवैद्य मार्गे विल्हेवाट लावली जात आहे,  हे अनेक घटनांवरून समोर आले आहे.  

सुरक्षितपणे विल्हेवाट लागणे गरजेचे 
nऔषध प्रक्रिया व उत्पादनापासून तयार झालेली गुणवत्तारहित औषधे ही घातक कचरा प्रकारामध्ये मोडतात. त्यामुळे अशा प्रकारचा सर्व कचरा शास्त्रीय प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावण्यासाठी, घातक कचरा प्रक्रिया केल्या जाणाऱ्या सामायिक सुविधांमध्ये पाठवणे, तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अवैधपणे टाकलेल्या घातक कचऱ्याचे सर्वोच्च न्यायालय समितीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार सुरक्षितपणे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कठोर पावले खंबीरपणे उचलून अंमलबजावणीही केली गेली पाहिजे. 

घातक कचऱ्यातील प्रदूषक  घटक, अपघात प्रतिबंधक तसेच मानवी जीवनावर व पर्यावरणावर होणारे परिणाम मर्यादित ठेवून पर्यावरण संरक्षण करणे काळाची गरज आहे. अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात घातक कचरा साठवणे किंवा विल्हेवाट करणे हे म.प्र.नि. मंडळाच्या घातक कचरा नियमाचे ज्या उद्योगाकडून उल्लंघन केले जाईल, अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणात दंड व दीर्घ काळ उत्पादन बंद यासारखी करवाई केली गेली तरच असे गैरकृत्य करण्यास कोणी धजावणार नाही.
 

Web Title: Disposal of hazardous waste by law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.