CoronaVirus News: 10 patients die due to lack of oxygen in Vasai ?, agitation in taluka, anger among relatives of patients | CoronaVirus News : वसईत ऑक्सिजनअभावी १० रुग्णांचे मृत्यू?, तालुक्यात खळबळ, रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संताप  

CoronaVirus News : वसईत ऑक्सिजनअभावी १० रुग्णांचे मृत्यू?, तालुक्यात खळबळ, रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये संताप  

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांसाठी संजीवनी असलेल्या गॅस ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने नालासोपाऱ्याच्या दोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी दहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.. मृत्यू झालेल्यांमध्ये एका माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. 
   दरम्यान, वसईत केवळ तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन असल्याचीही माहिती समोर आली आहे. ही बाब माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे दिल्याने वसई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
      वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत ५ हजार ९६८ कोरोनाचे रुग्ण असून ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत. यातील काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने ऑक्सिजनची नितांत गरज असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने कोरोना रुग्णांचे हाल होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. श्रीप्रस्थ येथील तीन कोरोना रुग्णांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती राजीव पाटील यांनी दिली, तर संध्याकाळी नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील विनायका हॉस्पिटलमध्ये सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त पसरल्यानंतर मृतांच्या व दाखल रुग्णांच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला. घटनास्थळी पोहोचलेल्या तुळींज पोलिसांनी संतप्त नातेवाइकांना बाजूला करून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली. दरम्यान, विनायका हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी सोमवारी दुपारपर्यंत १० ऑक्सिजन गॅस सिलिंडर पुरविण्यात आले होते. परंतु तेथे सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने नातेवाइकांनी आणि लोकांनी गर्दी केल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 
रायगड येथील जेएसडब्ल्यूच्या ऑक्सिजन फिलिंग स्टेशन येथून वसई-विरार महापालिकेला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जातो. वसई तालुक्यात गॅलेक्सी आणि स्पीड हे दोन रिफलर सेंटर आहेत. सदर ऑक्सिजन सिलिंडर वसईत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने हा तुटवडा निर्माण झाला. मनपाकडे सध्या तीन तास उरेल इतका ऑक्सिजन असल्याची माहिती माजी महापौर राजीव पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या मेसेजमधून देण्यात आली आहे. ऑक्सिजन मिळाला नाही तर कोरोना रुग्णांचे हाल होऊन जीवितहानी होऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. नालासोपाऱ्याच्या या दोन्ही  हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळपासून ऑक्सिजनमुळे दहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, माजी नगरसेवक किसन मामा बंडागळे यांचा मृत्यूही ऑक्सिजन न मिळाल्याने झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ऑक्सिजन साठा संपलेला नसून, तो थोड्याफार प्रमाणात उपलब्ध आहे. कुठून ऑक्सिजन मिळेल का यासाठी प्रयत्न करत आहोत. ठाणे येथून काही  ऑक्सिजन सिलिंडर मागविले आहेत. जेथून ऑक्सिजन सिलिंडर येतात तेथे आयुक्त, उपायुक्त संपर्क करत आहेत.
- सुरेखा वाळके,  मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका
 

Read in English

Web Title: CoronaVirus News: 10 patients die due to lack of oxygen in Vasai ?, agitation in taluka, anger among relatives of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.